लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:20 PM2020-01-03T15:20:53+5:302020-01-03T15:25:32+5:30
धानोरा येथील एका चहाच्या टपरीवर ४ हजारांची लाच स्वीकारताना ढोले याला रंगेहाथ पकडले.
बीड : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ढोले याला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.
अंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कैलास भाऊराव थोरवे यांच्यासह पत्नी व मुलावर एन.सी. दाखल झाली होती. या प्रकरणात पत्नी आणि मुलांची नावे वगळण्यासाठी तसेच प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी याच पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ढोले याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. सदर लाच देण्याची मानसिकता नसल्याने या प्रकरणी कैलास थोरवे यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात १० आॅक्टोबर २०१२ मध्ये तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेची पडताळणी करून आष्टी तालुक्यातील धानोरा बस स्टॉपवर ११ आॅक्टोबर २०१२ रोजी सापळा रचला.
धानोरा येथील एका चहाच्या टपरीवर ४ हजारांची लाच स्वीकारताना ढोले याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र बीड येथील प्रमुख सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांची मंजुरी घेऊन पंच सचिन जोगदंड, तक्रारदार कैलास थोरवे, तपासी अधिकारी सुरेश चाटे यांच्या साक्षी नोंदविल्या. या साक्षी पुराव्यावरून आरोपी विलास ढोले यास दोषी धरून एक वर्षे सक्तमजूरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.