माजलगावात भोई समाजाचे जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:17 AM2019-03-01T00:17:29+5:302019-03-01T00:18:36+5:30
माजलगाव जलाशयावर स्थानिक मच्छिमार भोई समाज अनेक वर्षांपासून आपली उपजिविका भागवत असून ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरु वारी माजलगांव जलाशयात सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
माजलगाव : माजलगाव जलाशयावर स्थानिक मच्छिमार भोई समाज अनेक वर्षांपासून आपली उपजिविका भागवत असून ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरु वारी माजलगांव जलाशयात सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. ठेकेदारापासून मुक्त करुन जलाशय मच्छीमारांसाठी खुले करण्याची मागणी करण्यात आली.
माजलगाव जलाशयावर परंपरागत स्थानिक भोई समाज मासेमारी करत आहेत. मागील काही महिन्यापासून त्यांचा व ठेकेदार,उपठेकेदार यांचा वाद सुरु आहे. यासंदर्भात भोई समाजाकडून नेहमीच वेगवेगळे आंदोलने करण्यात आली आहेत.परंतु संबंधित आंदोलनाची कुठलीही दखल न घेता दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भोई समाज आणि मच्छीमार संघर्ष समितीने जलाशयात जलसमाधी आंदोलन सुरू केले.
मच्छिमारांवरील खाटे गुन्हे मागे घेण्यात यावे,माजलगांव जलाशयाचा सन २०१९ ते २०१२० पर्यंतचा मासेमारी तलाव ठेका तात्काळ रद्द करावा, ,मच्छिमारावर अन्याय करणार्या ठेकेदाराला तात्काळ अटक करावी, खोटे गुन्हे दाखल करु न घेणाऱ्या पोलीस अधिकाºयाला निलंबीत करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मच्छिमार संघर्ष सतिीचे अध्यक्ष भीमा गहिरे, रामनाथ कुंबळे, गणेश परसे, ज्ञानेश्वर कचरे, कैलास भुंगाठे ,बंडू मंजरे, सतीश चूनारे, तानुबाई कचरे अनुसया घुंगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात मच्छिमार भोई समाजाच्या महिला मुला-बाळांसह वृद्धांचाही मोठा समावेश होता. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले होते.