केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 07:52 PM2023-06-27T19:52:26+5:302023-06-27T19:52:43+5:30
बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
केज : तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश नरसू मिसाळ हे राजस्थानमधील सुरतगढ येथे परेडला जाताना भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून सोमवारी सकाळी शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
केज तालुक्यातील उमेश नरसू मिसाळ ( 22) हे 2 वर्षांपूर्वी 25 मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. उमेश मिसाळ यांचे आई, वडील हे ऊसतोड कामगार आहेत. 6 महिन्यापूर्वी केकाणवाडी येथील प्रतीक्षा केकाण यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 15 दिवसांपूर्वीच ते पुतणीच्या लग्नासाठी गावी आले होते. परंतु पुतणीच्या हळदीच्या दिवशीच त्यांना मराठा बटालियनमध्ये तातडीने परत येण्याचे आदेश आले. यामुळे पुतणीचे लग्न सोडून ते देशसेवेसाठी सुरतगढ, राजस्थानकडे रवाना झाले.
दरम्यान, सोमवारी सकाळी ते परेडसाठी जात असताना भूमिगत विजवाहिनीतून त्यांना धक्का बसून ते सेवारत असतानाच शहीद झाले. ही वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 2 भाऊ असा परिवार आहे. उमेश मिसाळ यांचे पार्थिव कोल्हेवाडी येथे बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पोहचणार असून 9 वाजण्याच्या दरम्यान शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी दिली.
माजी सैनिक संघटनेचे आवाहन...
सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळ यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने पुणे येथे घेऊन येणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांच्या मूळ गावी कोल्हेवाडी येथे पार्थिव पोहचेल. शहीद भूमीपुत्रास अंतिम निरोप देण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेच्यावतीने अध्यक्ष अजिमोद्दीन शेख, सचिव प्रा हनुमंत भोसले व सर्व माजी सैनिकांनी केले आहे.