जयदत्त क्षीरसागरांची दुसऱ्या पुतण्याही साथ सोडणार; योगेश क्षीरसागर अजित पवार गटात?
By सोमनाथ खताळ | Published: August 22, 2023 07:00 PM2023-08-22T19:00:50+5:302023-08-22T19:01:50+5:30
आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत आहेत, तर शिवसेने नाते तोडल्यानंतर जयदत्त क्षीरसागरांची भूमिका अद्यापही अस्पष्ट !
बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा एक पुतण्या शरद पवार गटात गेल्यानंतर दुसरा पुतण्या अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. २३ ऑगस्टला मुंबईत जाऊन किंवा २७ ऑगस्टला बीडमधील सभेत ते प्रवेश करणार असल्याचे समजते. पुतण्या अजित पवार गटात जाणार असला तरी काका जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय भूमिकेबाबत मौन कायम ठेवलेले आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही राजकीय घडामोडी गतीने होत असल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादीत आगोदर स्व. केशरबाई क्षीरसागर यांचा जिल्ह्यात दबदबा होता. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी सूत्रे हाती घेतली. मंत्रिपदही मिळविले. काकूंचा दुसरा मुलगा डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष झाले. बीड शहरासह मतदारसंघात केवळ ‘क्षीरसागर राज’ होते. मात्र, मागील काही वर्षांपासून हे घर फुटत चालले आहे. अगोदर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा विधानसभेत पराभव केला. त्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपला दुसरा पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर आणि सून डाॅ. सारिका क्षीरसागर यांना पुढे आणत सक्रीय केले. दोघेही मागील पाच वर्षांपासून नागरिकांच्या भेटीगाठी घेत संपर्क वाढवत आहेत.
एकीकडे क्षीरसागरांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच शिवसेनेतही फूट पडली. जयदत्त क्षीरसागर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बायपास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ता कामांचे उद्घाटन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने त्यांच्याशी नाते तोडले. तेव्हापासून ते कोणत्याही पक्षात नाहीत. असे असतानाच आता त्यांचा पुतण्या डॉ. योगेश यांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. त्यांना रोखण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले, परंतु यात यश आले नसल्यानेच २३ किंवा २७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा जयदत्त क्षीरसागरांसाठी माेठा धक्का असणार आहे.
जयदत्त क्षीरसागर भूमिका कधी मांडणार ?
शिवसेनेने नाते तोडल्यानंतर जयदत्त क्षीरसागरांनी अद्यापही माध्यमांसमोर येऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होती. परंतु माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आम्हाला पाहुण्यांची गरज नाही, असे म्हणत नाव न घेता त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही थेट टीका केली होती. आता या सर्व घडामोडींवर जयदत्त क्षीरसागर कधी बोलणार? आपली राजकीय भूमिका कधी स्पष्ट करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय
मागील ५० वर्षांत बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिले आहे. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालू राहील. सध्या सुरू असणाऱ्या चर्चेत किंवा राजकीय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही, भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकीय निर्णय घेतला जाईल. राजकीय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाहीत. जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल.
- जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री