जयदत्तअण्णा हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे शिवसैनिकांची काळजी घेणारा नेता -पिंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:26 AM2019-10-08T00:26:13+5:302019-10-08T00:26:54+5:30
जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.
बीड : अवघ्या चार महिन्यात शिवसेनेत दाखल झालेल्या क्षीरसागरांनी सर्वसामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. तसेच शिवसैनिकांची कुटूंब प्रमूखाप्रमाणे काळजी ते घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विधानसभेवर भगवा फडकवणं हे शिवसैनिकांचं काम आहे. जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.
बीड मतदार संघातील उदंडवडगाव, मोरगाव, वानगाव, साखरेबोरगाव, गोगलवाडी, रौळसगाव, खडकीघाट, देवीबाभुळगाव व तांदळवाडी घाट येथे जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या कॉर्नर बैठकांमधून शिवसैनिकांना संबोधित करतांना बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी कुंडलीक खांडे, विलास महाराज शिंदे, गोरक्ष रसाळ, सुरेश शेटे, धनंजय कुलकर्णी, मदनराव पिंगळे, गणेश जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बाळासाहेब पिंगळे म्हणाले, शिवसेनेशी गद्दारी करुन गेलेले लोक आज निष्ठावंत शिवसैनिकांना सल्ले देत आहेत. त्यांच्याबद्दल पुतणामावशीचं प्रेम दाखवत आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणारांनी आम्हाला काय करावं हे शिकवू नये सांगत पिंगळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आम्हाला मातोश्रीचा व शिवसेना प्रमूखांचा आदेश महत्वाचा असतो, असे ते म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्यासारखा विकासाची दूरदृष्टी असलेला नेता बीडचा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.