क्षीरसागरांच्या मंत्रीपदामुळे बीड जिल्ह्यात युतीची ताकद वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:15 AM2019-06-17T00:15:26+5:302019-06-17T00:15:41+5:30
मंत्रीपदामुळे क्षीरसागर यांच्या गटात आनंद ओसंडून वाहत असताना दुसरीकडे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या गटात मंत्रीपद न मिळाल्याने अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्याला जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने कॅबिनेट दर्जाचा दुसरा लाल दिवा मिळाला. मंत्रीपदामुळे क्षीरसागर यांच्या गटात आनंद ओसंडून वाहत असताना दुसरीकडे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या गटात मंत्रीपद न मिळाल्याने अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना युती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेचे क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांनी केलेल्या लोकसभा निवडणुकीतील उपकाराची परतफेड केली आहे. अनेक वर्षांपासूनच्या मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या व युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे मेटे यांना यावेळेसही लालदिव्यापासून वंचित ठेवले आहे.
राज्यातील एक ओबीसी नेतृत्व म्हणून क्षीरसागर यांच्याकडे बघितले जाते. शैक्षणिक, सहकारी संस्थांच्या माध्यमातून तगडी यंत्रणा असलेल्या क्षीरसागर यांचा फायदा जिल्ह्यात शिवसेना वाढीस निश्चितच होणार आहे. एकेकाळी जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व होते. बीड विधानसभा निवडणुकीत तीन वेळा शिवसेना विजयी झाली होती; परंतु त्यानंतर तडजोडीच्या राजकारणात शिवसेना इतकी दुबळी झाली होती की सेनेच्या ढाण्या वाघात आक्रमकता तर सोडाच साधी डरकाळी फोडण्याचे त्राणही उरले नव्हते. आता क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेला एक मातब्बर नेता मिळाला आहे.
जिल्ह्याच्या भाजप नेत्या पालकमंत्री पंकजा मुंडे व क्षीरसागर घराण्यांचे दोन पिढ्यांपासून गुळपीठ आहे. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत राहून क्षीरसागर यांनी भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिलाच नाही तर उघडउघड त्या निवडून येण्यासाठी आपली यंत्रणा राबवली. त्यांच्यामुळे भाजपचा विजय अधिक सुकर झाला. ते भाजपमध्ये स्थिरावतील असे वाटत असताना त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तेव्हाच ते शिवसेनेमध्ये जातील हे निश्चित झाले होते. लोकसभा निवडणूक मतमोजणी पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच त्यांचे मंत्रीपद निश्चित झाले होते.
इकडे क्षीरसागर यांचे कट्टर विरोधक शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना मंत्रीपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. युतीतील शिव-संग्राम वगळता सर्व घटकपक्षांना मंत्रीपद मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली गाढ मैत्री आहे असे सांगणाºया विनायक मेटे यांना मंत्रीपदापासून कोणी दूर ठेवले याची चर्चा आता जिल्ह्यात झडू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंडे यांचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा आहे, अशी भूमिका मेटे यांनी घेतली होती. त्यांची ही भूमिकाच त्यांच्या मंत्रिपदाच्या मार्गात अडसर ठरली.
विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या भूमिकेला तीळमात्रही महत्व दिले नव्हते. माझी बहीण पडली तरी चालेल परंतु मेटे यांची मदत घेणार नाही असे पंकजा यांनी पक्षश्रेष्ठींना ठणकावून सांगितले होते. क्षीरसागर यांना आता मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा बीडच्या विधानसभा जागेवर दावा असेल. युतीमध्ये तशी ही जागा शिवसेनेला सुटली आहे. आगामी निवडणुकीत युती झाली तर निश्चितच ही जागा शिवसेनेला भाजपा सोडून देईल, त्यामुळे मेटे यांच्या उमेदवारीचा प्रश्न युतीसमोर निर्माण होणार आहे. गतवेळी मेटे यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढविली होती. त्यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला होता. क्षीरसागर यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्यामुळे विधानसभा निवडणूक उमेदवारीचा प्रश्न मिटला आणि मंत्रिपदही पदरात पडले. या सर्व राजकीय उलथापालथीत सर्वात जास्त नुकसान मेटे यांचे झाले.
क्षीरसागरांमुळे जिल्ह्यात युती अधिक भक्कम झाली त्याचा फटका निश्चितच राष्ट्रवादीला बसू शकतो. गेली दोन वर्षे राष्ट्रवादीत क्षीरसागर यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. पवारांशी संधान साधून क्षीरसागर यांची पक्षातच कोंडी करताना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना काकाच्या विरोधात ताकत देण्याचा प्रयत्न जिल्हा नेतृत्वाने केला. आज क्षीरसागर यांनी ही कोंडी फोडत शिवसेनेचा मार्ग स्वीकारलाच नाही तर कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद घेऊन राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वावरच कुरघोडी केली आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ युतीकडे आहेत. लोकसभा निवडणुकीतही या मतदार संघात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले आहे. पंकजा मुंडे, सुरेश धस व जयदत्त क्षीरसागर यांच्या ताकदीपुढे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काय करिष्मा करेल याची उत्सुकता लागली आहे आज तरी जिल्ह्याला मिळालेल्या या मंत्रीपदामुळे शिवसेनेसोबतच युतीचीही वाढली हेही तितकेच खरे.
फेसबुकवर पोस्ट शेअर : नाराजी व्यक्त
कदम लड़खड़ा रहे है पर मंजिल के रास्तो से भटका नहीं हूँ
अकेला ही चल रहा हूँ पर किसी हाथ का इंतजार नहीं हूँ
अपनों ने दिल में लगायी थी जो आग कभी, उसे बुझाता नहीं हूँ ..
कभी रूका हूँ , कभी थका हूँ पर हारा नहीं हूँ...
आ. मेटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून नाराजी आणि मनोदय व्यक्त केला. राजकारणात चढ-उतार असतातच. झालेल्या चुका कशा सुधारायच्या याचा जो नेता कार्यकर्ता विचार करतो तोच राजकारणामध्ये यशस्वी होतो. मेटे यांनी देखील आत्मपरीक्षण करून पुढील मार्ग स्वीकारला पाहिजे. अजूनही वेळ गेली नाही. मेटे यांनी फेसबुकवर आणखी एक पोस्ट शेअर करून आपल्या सभोवताली कशी मंडळी आहे याचे विश्लेषण केले आहे. सहकार्य करण्यासाठी काही मंडळी निश्चितच सोबत आहे परंतु धक्का देण्याच्या प्रयत्नात अनेक जण आहेत, हेही त्यांनी सांगितले आहे. धक्का देणारी मंडळी कोण आहे, याबद्दल राजकीय पटलावर चर्चा सुरू झाली आहे.