जीप- दुचाकीची समोरासमोर धडक; एका मुलाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 07:02 PM2022-12-26T19:02:19+5:302022-12-26T19:02:32+5:30
जखमी दोघांवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : दळण घेऊन मित्रांसोबत घराकडे निघालेल्या दुचाकीवरील तीन मुलांना जीपने जोरदार धडक दिली. यात एका मुलाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहेत. विनोद राजेश शिंदे ( १४ वर्ष रा. तिर्थपुरी जि.जालना ) असे मृत मुलाचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नगर- बीड महामार्गावर झाला.
आष्टी तालुक्यातील कडा येथून जाणाऱ्या नगर- बीड राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला झोपड्यात एक कुटुंब राहते. हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी जालना जिल्ह्यातून दोन वर्षापुर्वी येथे आलेले आहे. दिवसभर मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. रविवारी सायंकाळी कडा येथील एका पिठाच्या गिरणीवरून विनोद राजेश शिंदे हा अर्जुन राजू शिंदे ( १६ रा.जालना) आणि सुरज राजू पवार ( १४ रा.जालना ) यांच्यासोबत घराकडे दुचाकीवरून ( क्र. एम.एच १४, डी.झेड. २६७०) निघाला. दरम्यान, अहमदनगरवरून आष्टीकडे जात असलेल्या जीपने ( एम. एच २४ व्ही.६२६०) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात विनोदचा जागीच मृत्यू झाला.
तर अर्जुन राजू शिंदे आणि सुरज राजू पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शोकाकुल वातावरणात मयत मुलावर कडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुन शिंदेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.