इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केला जीपचालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:05 AM2019-12-12T00:05:52+5:302019-12-12T00:06:27+5:30
परळी तालुक्यातील वाघाळा शिवारात म्हातारगाव -कावळेवाडी रोडवर जीप चालकाचा खून करण्यात आला होता. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती.
बीड : परळी तालुक्यातील वाघाळा शिवारात म्हातारगाव -कावळेवाडी रोडवर जीप चालकाचा खून करण्यात आला होता. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. यातील दोन आरोपींना पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले आहे. तसेच इतर सशस्त्र घरफोडी व गुन्ह्यातील आरोपी देखील अटक केले आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
यावेळी पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक राहुल धस, पोनि भारत राऊत, पेठ बीड ठाणे प्रमुख प्रदीप त्रिभुवन, परळी ठाणे प्रमुख विश्वास पाटील, माजलगाव ठाणे प्रमुख सय्यद सुलेमान, दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख सोपनि गजानन जाधव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
मागील तीन दिवसात परळी ग्रामीण, माजलगाव, व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत खूनाच्या घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटनांमधील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याबद्दल पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी संबंधित पोलिसांचे कौतुक देखील केले.
माजलगाव येथे पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याचा कुठलाही पुरावा नसताना अर्धवट जळालेल्या प्रेताच्या आधारावर या खुनातील आरोपी पती रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहेमान शेख (रा. इंदिरानगर माजलगाव) याला ४ तासाच्या आत ताब्यात घेतले होते. या सर्व आरोपींना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले.
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, गुन्हेगारी घडल्यानंतर त्याचा शोध लावणे पोलिसांचे काम आहे. तिन्ही गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. तसेच या तिन्ही प्रकरणामध्ये प्रतिबंधात्मक करण्यासारखी एकही घटना नव्हती. या कार्यवाहीबद्दल पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, उपाधीक्षक राहुल धस, श्रीकांत डिसले, भास्कर सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि भारत राऊत, सय्यद सुलेमान, प्रदीप त्रिभुवन, विश्वास पाटील, दरोडा प्रतिबंधक प्रमुख सपोनि गजानन जाधव, संदीप सावळे, सुजित बडे व कर्मचारी राहुल शिंदे, दिलीप गित्ते, महेश चव्हाण, चालक संतोष जायभाय यांनी केली.
जीप चालकाचा गेला नाहक बळी
परळी तालुक्यातील वाघाळा परिसरात मंगळवारी विजय यमगर या जीपचालकाचा खून केल्याची घटना समोर आली होती. यातील आरोपी कृष्णा अच्युत मुंडे (नागापिंप्री ता. अंबाजोगाई), बालाजी भीमराव जाधव (रा. तडोळी, ता.परळी ) यांना पोलिसांनी अटक के ली आहे. तिसरा आरोपी सतीश पवार हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
परळी तालुक्यातील दगडवाडी येथील जीपचालक विजय यमगर हे किरायाणे वाहन देतात. सोमवारी परळीहून कृष्णा मुंडे व बालाजी जाधव यांनी अंबाजोगाईवरून रुग्णाला घेऊन यायचे आहे असून म्हणून गाडी भाड्याने केली. दरम्यान रुग्ण नाही तर मित्राला भेटायला जायचे असे चालक विजय यांना सांगितले. यावर जास्तीचे भाडे लागेल, असे सांगण्यात आले. बालाजी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून तो विविध वस्तूंवर प्रयोग करतो. याच छंदातून त्याने स्वत:च्या घरी गावठी पिस्तूल, गोळ््या देखील तयार केल्या होत्या. त्याला चारचाकी गाडी चोरायची होती व मुंबईला पळून जायचे होते. अशी प्राथमिक माहिती पोलिसांना आहे. याच कारणावरून अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे चालक विजय यमगर यांना वार करुन त्यांचा खून केला. मृतदेह गाडीत टाकून जवळपास ५० किमी पर्यंत फिरवला. त्यानंतर डिझेल संपल्यामुळे म्हातारगाव रोडवर बंद पडली. त्यानंतर मृतदेहासह गाडी त्याच ठिकाणावर सोडून आरोपींनी पोबारा केला होता. परंतु तांत्रिक व खबºयाच्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी खून केल्याची कबुली देखील दिली आहे.
पायलट होण्याऐवजी तो खुनी झाला
चारचाकी गाडी चोरून तिचे नूतनीकरण करणारा बालाजी जाधव याचा इंजिनिअर असल्याची बतावणी करणा-या मानस होता. यासाठीच चालकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. दरम्यान बालाजी याने आपल्या घरात गावठी पिस्तूल, छोटे हेलिकॉप्टर देखील बनवले होते. परंतु गाडी चोरण्याच्या नादात खून केला आणि पायलट होण्याऐवजी तो खुनी झाला.