हायवेवर जीपची झडती, गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स जप्त
By अनिल भंडारी | Published: January 11, 2024 05:58 PM2024-01-11T17:58:07+5:302024-01-11T17:59:01+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केलेल्या जीपसह दारूचा साठा
बीड : सोलापूर- धुळे महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका जीपची झडती घेतली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा राज्य बनावटीच्या दारूचा साठा आढळून आल्यानंतर केलेल्या कारवाईत दहा लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ११ जानेवारी रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
सोलापूर- धुळे महामार्गावर एका जीपमधून अवैध दारूचा माल येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून बीड येथील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चौसाळा परिसरात एका जीपची (क्र. एम. एच. ४२ के. ३६३५) झडती घेतली. यावेळी जीपमध्ये गोवा राज्य बनावटीची व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारू मिळून आली. या गुन्ह्यातील आरोपी सुरेश उत्तम गोपाळघरे व इतरांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.