सराफा व्यापाऱ्याच्या लाखोंच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार, अंबाजोगाईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:52 PM2022-02-07T13:52:41+5:302022-02-07T13:52:56+5:30
दिवसाढवळ्या चौकात घडलेल्या चोरीमुळे अंबाजोगाईत खळबळ
अंबाजोगाई- दिवसा ढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईत घडली आहे. चोरट्यांनी भरदिवसा अंबाजोगाई येथील सराफा व्यापारी राहुल राठोड यांना सोन्याचे दागिणे आणि स्कुटी चोरल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणाचा आता पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे गुरुवार पेठेत सोन्या-चांदीचे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटरच्या कुलुपात फेवीक्विक आणि वाळू टाकली. सोमवारी सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले.
परंतु, कुलूप उघडत नसल्याने ते स्कुटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावीवाल्याकडे गेले. यावेळी ते चावीवाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी त्यांची स्कुटी घेऊन पोबारा केला. त्या स्कुटीच्या डिकीत लाखो रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.