३३ वर्षांपूर्वी चोरी झालेले दागिने परत मिळाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:57+5:302021-03-16T04:32:57+5:30
अनिल गायकवाड कुसलंब - नेहमी म्हटले जाते, ज्यांच्या नशिबात जी गोष्ट असेल ती काहीही झाले तरी परत मिळतेच. ...
अनिल गायकवाड
कुसलंब - नेहमी म्हटले जाते, ज्यांच्या नशिबात जी गोष्ट असेल ती काहीही झाले तरी परत मिळतेच. नशिबातील गोष्ट कधीही हिरावली जाऊ शकत नाही, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा एका घटनेच्या निमित्ताने आला. पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील एका महिलेचे तब्बल ३३ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले मंगळसूत्रातील मणी आता ३३ वर्षांनंतर पुन्हा परत मिळाले आहेत.
प्रलंबित जुन्या गुन्ह्यांमधील मुद्देमालांची प्रकरणे निकाली काढताना पाटोद्याचे एपीआय महेश आंधळे व त्यांच्या टीमने या महिलेचा शोध घेऊन चोरीला गेलेले दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले .
२७ जून १९८८ रोजी पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील आशाबाई विठ्ठल गायकवाड (त्यावेळी वय २२ वर्षे) या आपल्या पतीसह निरगुडी परिसरातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पतीला मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे मणी हिसकावून घेतले. यानंतर आशाबाई गायकवाड यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन याविषयी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले व पुढील प्रक्रिया झाली, परंतु यादरम्यान आशाबाई गायकवाड या कामानिमित्त आपले गाव सोडून दुसरीकडे स्थायिक झाल्या. त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल त्यांना परत देण्यासाठी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा शोध लागला नाही. पुढे पोलिसांकडे प्रलंबित मुद्देमालांच्या यादीत हे दागिने पडून राहिले. पोलिसांकडे गुन्ह्यांमध्ये पडून असलेल्या मुद्देमालाचे प्रत्येकवर्षी व्हॅल्युएशन केले जाते. सध्या पोलीस अधीक्षक आर. राजा व डीवायएसपी विजय लगारे यांच्या आदेशानुसार अशाप्रकारची प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एपीआय महेश आंधळे यांनी या ३३ वर्षांपूर्वीच्या घटनेतील मुद्देमाल संबंधित महिलेला परत मिळावा, यासाठी आपल्या टीमसह त्या महिलेचा शाेध सुरू केला.
ए. एस. आय. येवले, पोलीस नाईक सुभाष मोठे, अशाेक तांबे, बळीराम कातखडे, बाळू सानप आदी कर्मचाऱ्यांनी या महिलेच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. ही महिला सध्या बीड या ठिकाणी वास्तव्यास असल्याची व एका कारखान्यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या महिलेला पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन आपले दागिने घेऊन जा, असे सांगितले. सदर घटनेला ३३ वर्षे होऊन गेल्याने आशाबाई गायकवाड यांना त्याचा विसरही पडला होता. मात्र पाटोदा पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा त्यांची अमानत त्यांना परत मिळाली. शुक्रवारी त्या पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या व सर्व शहानिशा करून पोलिसांनी त्यांना त्यांचे दागिने परत केले. इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला.
पोलिसांकडे गुन्ह्यांमध्ये पडून असलेल्या मुद्देमालाचे प्रत्येकवर्षी व्हॅल्युएशन केले जाते. सध्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अशा प्रकारची प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच हे १९८८ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल अजूनही ठाण्यातच असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना त्यांचे दागिने परत सुपूर्द केले.
महेश आंधळे, स. पो. निरीक्षक, पाटोदा