माणूस म्हणून जगण्याचे बळ जिजाऊंनी दिले : गिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:10+5:302021-01-15T04:28:10+5:30
बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ ...
बीड : दऱ्याखोऱ्यात माणसाला शोधत आणि त्यांना जोडत स्वराज्याचा पाया उभा करण्याचे विश्वापेक्षा मोठे काम राजमाता जिजाऊंनी केले. बाळ शिवबावर केलेल्या संस्कारामुळे शिवबा युगप्रवर्तक झाले. त्यातून स्वराज्य प्रस्थापित झाले. महाराष्ट्रात न्यायव्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून रयतेला माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले. शिवविचार आणि आचाराची आज गरज आहे, तर स्वामी विवेकानंदाच्या तेजस्वी विचारांनी आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या दोनही विभूती आपले आदर्श असून, महापुरुषाचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.
गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते राहुल गिरी हे बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. पी. राठोड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून निवेदक माधव चाटे, उपप्राचार्य आर. एस. सानप, प्रा. एस. एल. पवळ, प्रा. अशोक मुंडे, प्रा. डॉ. अयोध्या पवळ, वराट, दामोधर मगर, प्रा. डॉ. खताळ, रामदास शिंदे, प्रा. डॉ. फाटक, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शकिला शेख हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल गिरी यांनी ओघवत्या शैलीत विचार व्यक्त करुन उपस्थित विद्यार्थी, शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक पठाण अकबर यांनी केले, तर रामदास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.