जिवाशी खेळ; डॉक्टर नव्हे, कर्मचाऱ्यांकडूनच क्षयरोग्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:37 AM2021-08-28T04:37:08+5:302021-08-28T04:37:08+5:30

डॉक्टरांची विनापरवानगी दांडीयात्रा : बीडमधील क्षयरोग कार्यालयातील कारभाराचा 'लोकमत'कडून पर्दाफाश बीड : येथील क्षयरोग कार्यालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला ...

Jivashi game; Treatment of TB patients by staff, not doctors | जिवाशी खेळ; डॉक्टर नव्हे, कर्मचाऱ्यांकडूनच क्षयरोग्यांवर उपचार

जिवाशी खेळ; डॉक्टर नव्हे, कर्मचाऱ्यांकडूनच क्षयरोग्यांवर उपचार

googlenewsNext

डॉक्टरांची विनापरवानगी दांडीयात्रा : बीडमधील क्षयरोग कार्यालयातील कारभाराचा 'लोकमत'कडून पर्दाफाश

बीड : येथील क्षयरोग कार्यालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. डॉक्टरांनी विनापरवानगी दांडी मारली, तर आलेल्या क्षयरोग्यांवर चक्क कर्मचाऱ्यांनीच उपचार केल्याचे दिसले. 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघड झाला आहे. यानिमित्ताने येथील कारभाराचा पर्दाफाश झाला असून कारवाईची मागणी होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मागील कोपऱ्यात क्षयरोग कार्यालय आहे. येथे नियमित क्षयरोग अधिकारी नसल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तसेच दोनपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची वडवणीला बदली केल्याने सध्या डॉ. सतीश शिंदे हे एकमेव डॉक्टर आहेत. ते सुद्धा शुक्रवारी सकाळी वरिष्ठांना कल्पना न देता गैरहजर होते, तर दुसऱ्या बाजूला संशयित व क्षयरोगी येथे उपचारासाठी दाखल झाले होते. आलेल्या रुग्णांचा एक्स-रे काढण्यासह त्यांना औषधी देण्याचे काम येथील कर्मचारीच करत असल्याचे उघड झाले. याबाबत विचारणा केल्यावर उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रत्येकजण एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत होता. परंतु यामुळे सामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळल्याने कारवाईची मागणी होत आहे.

--

म्हणे, आम्हाला समजते...

डॉक्टरच्या उपस्थितीबद्दल कोणीच बोलले नाही. कर्मचाऱ्यांना उपचाराबाबत विचारताच एकाने, आम्हालाही थोडेफार समजते, असे सांगितले. यांनाच समजत असेल आणि अनुभव असेल, तर डॉक्टरांची गरजच काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

---

डॉक्टर फिरकतच नाहीत

काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यात डॉ. शिंदे हे कार्यालयाकडे फिरकतच नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. काहीवेळा रुग्ण उपचार न होताच परत जातात. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने उपचार करावे लागतात, असे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

--

कार्यालयात पद घेण्यासाठी 'वशिला'

या कार्यालयात वैद्यकीय अधिकारी पद घेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टाेपे यांच्याकडे स्वीय सहायकामार्फत वशिला लावण्यात आला आहे. एका महिला अधिकाऱ्याने येथे येण्यासाठी 'लाख'मोलाचे परिश्रम घेतले आहे. हे पद निवांत असल्याचा समज डॉक्टरांचा असल्याने येथे येण्यासाठी पूर्ण ताकद वापरली जात असल्याचे सांगण्यात आले. आठवडाभरात नवे डॉक्टर येणार असल्याचे समजते.

---

एडीएचओंना पाठविले आहे. विनापरवानगी गैरहजर राहिल्याने डॉक्टरला नोटीस काढून कारवाई केली जाईल. यापुढे असे होणार नाही, याची काळजी घेऊ.

- डॉ. राैफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

संचालकांची व्हिडीओ कॉन्फरन्स असल्याने मी प्रशिक्षण केंद्रात आहे. मी लगेच पाहतो. डॉक्टरवर कारवाई केली जाईल.

- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड

--

मी उमापूर व मादळमोही येथे भेट देण्यासाठी गेलो हाेतो. त्यामुळे कार्यालयात हजर नव्हतो.

- डॉ. सतीश शिंदे, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग कार्यालय, बीड

270821\27_2_bed_9_27082021_14.jpg~270821\27_2_bed_8_27082021_14.jpeg

एका रूग्णाला कर्मचाऱ्याने लिहून दिलेली चिठ्टी.~क्षयरोग कार्यलयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिकामी खूर्ची.

Web Title: Jivashi game; Treatment of TB patients by staff, not doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.