म्युकरमायकोसिसच्या सुलभ शस्त्रक्रियेसाठी ज्ञानप्रबोधिनीने दिली उच्च दर्जाची सक्शन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:30+5:302021-06-11T04:23:30+5:30
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलशास्त्र विभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर होते. प्रमुख अतिथी ...
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलशास्त्र विभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर होते.
प्रमुख अतिथी म्हणून नंदकिशोर मुंदडा, ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे, नेत्र विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे, नाक-कान-घसा विभागप्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. गणेश निकम, नाक-कान-घसा विभागाचे डॉ. सुधीर भिसे, डॉ. शंकर कोटुळे, छाती रोग विभागाचे डॉ. अनिल मस्के, सर्जरी विभागाचे डॉ. सतीश गिरेबाईनवाड यावेळी उपस्थित होते.
या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया अधिक गतीने व चांगल्या पद्धतीने करता याव्यात यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठ्या झालेल्या ज्ञानप्रबोधिनीच्या डॉक्टर मुलांनी केलेली ही मदत आहे. ज्ञानप्रबोधिनीने केलेली मदत असते असे ज्ञानप्रबोधिनी कधीच मानीत आहे. ही मदत नाही तर ते एका हाताने दुसऱ्या हाताला केलेले सहकार्य आहे, असे या कार्यक्रमात प्रसाद चिक्षे म्हणाले.
यावेळी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आणि भारत फोर्सच्या सहकार्याने आठ दिवसांच्या आत आणखी एक दुसरी अद्ययावत मशीन देण्यात येणार असल्याचे प्रसाद चिक्षे यांनी सांगितले. डॉ. प्रशांत देशपांडे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात दीड महिन्यापासून म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचे सांगत उपलब्ध यंत्रसामग्रीच्या बळावर आम्ही या शस्त्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया या मायक्रो डिप्रायडर मशीनद्वारे करण्यात येतात. मात्र, यासाठी लागणारी सक्शन मशीन ही उच्च दर्जाची नसल्यामुळे एका शस्त्रक्रियेसाठी जास्तीचा वेळ लागत होता. आता ती मिळाली आहे.
या महाविद्यालयात ११ मेपासून म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत १४७ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले, त्यापैकी १०० रुग्णांवर १२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी फक्त ३ रुग्ण मृत झाले. या ३ रुग्णांचा मृत्यूही त्यांच्या पूर्वीच्या असाध्य रोगामुळेच झाला. मात्र, शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यू म्हणून ३ मृत्यू असे म्हणता येईल, असे डॉ. प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.
डॉ. अभिमन्यू तरकसे यांनी नाक, कान, घसा, नेत्र विभाग आणि भूलशास्त्र विभाग या तीन विभागांतील सर्व डॉक्टर कर्मचारी या सगळ्यांच्या सहकार्यामुळे म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्याचे सांगितले, तर डॉ. भास्कर खैरे यांनी कोविडच्या पहिल्या लाटेत कोविडला समजावून घेत ज्याप्रमाणे उपचार पद्धती सुरू झाली त्याच प्रमाणे म्युकरमायकोसिसची उपचार पद्धती आणि त्याचे ऑपरेशन सुरू झाली. जागतिक स्तरावर म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यूदर ५०-६० टक्के एवढा असतानाच स्वारातीमध्ये फक्त २ टक्के मृत्यूदर आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे सांगून त्यांनी डॉ. प्रशांत देशपांडे व सर्व टीमचे अभिनंदन केले.