ऐन दिवाळीत जाणार ५९७ नर्सेसची नोकरी, सेवा समाप्तीचे सहसंचालकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 09:59 AM2022-10-20T09:59:26+5:302022-10-20T10:04:17+5:30
प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात नाकारली मंजुरी
सोमनाथ खताळ/ अविनाश साबापुरे
बीड/यवतमाळ : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजुरी नाकारल्याने राज्यातील ५९७ परिचारिकांची सेवा समाप्त केली जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. दिवाळी गोड होणार, या आशेवर बसलेल्या परिचारिकांची सेवा समाप्त करून आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वीच हिरावून घेतला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यामध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरिता ३ हजार २०७ पदांची मंजुरी केंद्र शासनाकडे प्रस्तावित केली होती; परंतु यातील २ हजार ६१० पदांनाच मंजुरी दिली असून, इतर ५९७ पदांना नामंजुरी दिली आहे. त्यामुळे या सर्व परिचारिकांची सेवा तत्काळ समाप्त करावी, असे पत्र सहसंचालक डॉ. कंदेवाड यांनी राज्यातील सर्वच सीईओंना काढले आहे.
या तीन मुद्द्यांवरून होणार कमी
मागील वर्षभरात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिकांची पदे रद्द करावीत, ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे, ज्यांची सेवा कमी झालेली आहे (सेवा ज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे, असे पत्रात म्हटले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
ठाणे ३, रायगड २१, पालघर १, नाशिक १९, धुळे १०, जळगाव १९, अहमदनगर २९, पुणे १६, सोलापूर ३९, सातारा २९, कोल्हापूर ३९, सांगली २३, सिंधुदुर्ग २१, रत्नागिरी १९, औरंगाबाद ८, जालना १०, परभणी १९, हिंगोली १२, लातूर २२, उस्मानाबाद १६, बीड ३०, नांदेड ३७, अकोला १३, अमरावती १९, बुलडाणा २४, वाशिम ९, यवतमाळ २१, नागपूर २४, वर्धा २२, भंडारा ११, चंद्रपूर ११ याप्रमाणे जिल्हानिहाय परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
मागील वर्षीही सेवा समाप्त
मागील वर्षीही एवढ्याच परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली होती. अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्तही केले होते; परंतु अचानक रात्रीच्या सुमारास आदेश बदलून त्यांची सेवा समाप्त करू नये, असे सांगण्यात आले होते. आता पुन्हा अशाच प्रकारे आदेश निघेल आणि सेवा टिकून राहील, अशी अपेक्षा या ५९७ परिचारिकांना लागली आहे.
ही पदे आरोग्य सेवेकरिता अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून काही अधिकारी जाणीवपूर्वक या परिचारिकांच्या जीवावर उठले आहेत.
अशोक जयसिंगपुरे,
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना.