अवघ्या 500 रुपयांत केले कामाचे जुगाड, आठवीतील पोराने केली आयडियाची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 07:41 AM2023-08-31T07:41:45+5:302023-08-31T07:46:15+5:30
प्रतीक पठाडे याने शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत असतानाच, आरडीओ यूनो व अल्ट्रा सोनिक सेन्सरच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी ‘ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे.
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : तालुक्यातील आष्टा (हरिनारायण) येथील पाचशेहून अधिक पटसंख्येच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रतीक विलास पठाडे या विद्यार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीने विविध सेन्सर्सचा वापर करून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी काठी तयार करून आकाशाला गवसणी घातली आहे.
प्रतीक पठाडे याने शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत असतानाच, आरडीओ यूनो व अल्ट्रा सोनिक सेन्सरच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी ‘ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे. रस्त्याने चालताना एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता पार करायचा असेल, अन् समोरून काही अडथळा आल्यास या स्टिक यंत्राची आपोआप घंटा वाजते. होणाऱ्या आवाजाने त्या अंध व्यक्तीसमोर येणारा कसलाही अडथळा एका क्षणात त्याच्या लक्षात येऊ शकतो. या विद्यार्थ्याचा हा आगळावेगळा प्रयोग शाळेचा नावलौकिक वाढवणारा ठरला आहे.
प्रतीक हा शिष्यवृत्तीपात्र व उत्कृष्ट कबड्डीपटूदेखील आहे. या प्रयोगासाठी मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप, विज्ञान शिक्षक नामदेव भिसे, धर्मनाथ शिंदे व इतरांचे त्याला मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनीही प्रतीकच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
सहा दिवसांत साकारली काठी
सेन्सर, बझर, प्लॅस्टिक पाइप, वायर हे साहित्य घेऊन सहा दिवसांच्या मेहनतीनंतर प्रतीकने अवघ्या ५०० रुपयात ही काठी बनवली आहे. प्रतिकूल परिस्थितीतील हा विद्यार्थी भविष्यात मोठे नाव करील, असा विश्वास शिक्षक धर्मनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
आमची शाळा शिक्षकांसाठी ज्ञानमंदिर असून, विद्यार्थी हेच दैवत समजून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आत्मविश्वास वाढावा, म्हणून शाळेचे सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात.
- मच्छिंद्रनाथ जगताप, मुख्याध्यापक,
जि. प. शाळा आष्टा (ह.ना.)