कारागृह नव्हे, कैद्यांचा कोंडवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:03 AM2019-03-01T00:03:58+5:302019-03-01T00:07:49+5:30
बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे.
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. येथे आठ बरॅक असून १६१ कैद्यांची (१४४ पुरूष व १७ महिला) क्षमता आहे. मात्र, सद्यस्थितीत आणि नेहमीच या कारागृहात ३०० च्या वर किंवा जवळपास कैदी असतात. त्यामुळे एका बरॅकमध्ये अक्षरश: कैद्यांना कोंबून ठेवण्याची वेळ येत आहे.
बरॅकची रूंदीही कमी असल्याने येथील कैद्यांना राहणे देखील जिखरिचे बनले आहे. त्यामुळे झोपणे, राहणे, बसणे, मनोरंजन करणे आदी किरकोळ गोष्टींवरून कैद्यांमध्ये वाद होत असल्याचेही अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. त्यामुळे कारागृहाला नवीन इमारत व बरॅक वाढविण्यासंदर्भात शासन स्तरावरून प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, गुरुवारी पहाटे बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
बीड : जिल्हा कारागृहातील धक्कादायक वास्तव गुरूवारी समोर आले आहे. येथील कारागृहात कैद्यांची क्षमता केवळ १६१ एवढी आहे, प्रत्यक्षात मात्र येथे रोज ३०० च्या वर कैदी रहात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे कारागृह नसून कैद्यांचा कोडवाडा बनले आहे. विशेष म्हणजे कैद्यांवर नजर आणि बंदोबस्तासाठी येथील मनुष्यबळही खुपच अपुरे असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच जिल्हा कारागृह सध्या गंभीर समस्यांचा सामना करताना दिसून येत आहे.
कैदी वाढले, मनुष्यबळ मात्र तेवढेच
कारागृहाची निर्मिती झाल्यापासून येथे १६१ कैद्यांना डोळ्यासमोर ठेवून ५३ अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले. सद्यस्थितीत कैद्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र अधिकारी, कर्मचारी आहे तेवढेच आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर बंदोबस्तासह कामाचा ताण वाढत आहे. जबाबदारी वाढल्याने आणि काही दुर्घटना घडल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा सुट्टया देखील रद्द केल्या आहेत.
डॉक्टरची केली मागणी
कारागृहात केवळ औषधनिर्मात्याचे पद भरलेले आहे. डॉक्टर देण्यासंदर्भात महानिरीक्षकांकडे पत्र पाठवून मागणी केलेली आहे. मात्र अनेक वर्षे झाले तरी ते अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे एखाद्या कैद्याला किरकोळ आजार झाला तरी त्याला जिल्हा रूग्णालयात पाठवावे लागते. अनेकवेळा गंभीर आजार असलेल्या कैद्यावर तात्काळ उपचार होत नाहीत.
इतर कारागृहात कैद्यांचे स्थलांतर
किरकोळ गुन्हा करून आलेले कैदी जास्त वाद घालत नाहीत. मात्र कुख्यात, सराईत गुन्हेगार हे नेहमीच इतर कैद्यांना त्रास देतात. अशावेळी त्यांना न्यायालय आणि महानिरीक्षकांच्या परवानगीने इतर कारागृहात पाठविले जाते.
यापूर्वी कल्याण कारागृहातून आलेल्या एका दरोडेखोराने इतर कैद्यांना मारण्याची धमकी दिली होती. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतही वाद घातले होते.
त्याला तात्काळ सेंट्रल कारागृहात पाठविले होते. साधारण दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती.
कारागृह अधीक्षकांचे पद रिक्त
अगोदरच अपुरे मनुष्यबळ. त्यात कारागृह अधीक्षकांसह तुरूंगाधिकारी या दोन अधिकाऱ्यांसह हवालदाराचे पद रिक्त आहे. सध्या एम.एस.पवार यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. संजय कांबळे हे निरीक्षक त्यांना सहकार्य करतात.