विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंकडेच शिवसंग्रामची धुरा, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड
By सोमनाथ खताळ | Published: September 6, 2022 10:35 PM2022-09-06T22:35:15+5:302022-09-06T22:35:46+5:30
पुण्यात राज्यस्तरीय बैठकीत एकमताने नियुक्ती.
बीड : शिवसंग्रामचे संस्थापक तथा माजी आ.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु आता यावर पडदा पडला असून स्व.मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीच ही धुरा सांभाळली आहे. पुण्यात मंगळवारी राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी सर्वानुमते ज्योती मेटे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
विनायक मेटे हे मुंबईला जात असतानाच १४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या गाडील अपघात झाला. यात त्यांचे निधन झाले. शून्यातून पक्ष उभारून सलग पाचवेळा विधानपरिषद सदस्य मिळविले होते. मेटे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता. परंतु त्यांच्या अचानक जाण्याने पक्ष पोरका झाला. आता यापुढे विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणासह इतर स्वप्न कोण पूर्ण करणार? मुख्य म्हणजे शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न होता. मेटे समर्थकांकडून ज्योती मेटे यांनीच जबाबदारी घ्यावी, असा हट्ट धरला जात होता. परंतु त्या प्रशासकीय अधिकारी असल्याने काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले होते. राज्यात सर्वत्र चर्चा होत असली तरी ज्योती मेटे यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
अखेर सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठक झाली. यात सर्वानुमते ज्योती मेटे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, विक्रांत आंब्रे, राजन घाग, संदीप पाटील, उदयकुमार आहेर, शेखर पवार, तुषार काकडे, कल्याण अडागळे, समिर निकम, केतन महामुनी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
'शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्रामसोबतच'
शिवसंग्राम स्थापनेचा मूळ उद्देश तडीस नेला जाईल. मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच विविध जाती -धर्मातील आरक्षण तथा उपेक्षित असणारे सर्व प्रश्न आपण संघटित होऊन यासाठी मोठा लढा उभा करून ते भविष्यात सोडवणार आहोत. तसेच शिवसंग्राम संघटनेची ही मोठी इमारत बेवारस सोडली जाणार नाही. विनायक मेटे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्राम संघटनासोबतच आहे, असे मत डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केले.