कचखाऊ धोरणामुळे धान्यमाफियांना रान मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:49+5:302021-07-23T04:20:49+5:30
माजलगाव : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा ६१० कट्टे गहू-तांदूळ भरताना शहर पोलिसांनी टेम्पो पकडला. त्यानंतर पुरवठा ...
माजलगाव : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा ६१० कट्टे गहू-तांदूळ भरताना शहर पोलिसांनी टेम्पो पकडला. त्यानंतर पुरवठा विभागाने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, तर तपासणी करून घेण्याचा आपला काय संबंध? अशी भूमिका पोलिसांनी घेतली. कारवाईत ताळमेळ नसल्याने तीन आरोपींना जामीन मिळाला. एक महिना उलटूनही याचा पुढे तपास न झाल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१६ जूनरोजी काळ्या बाजारात नेण्यासाठी गहू-तांदूळ टेम्पोमध्ये भरताना पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांकडे या मालाची कोणतीच कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी पुरवठा विभागास याबाबत कळवले. परंतु हा माल माजलगाव येथील नसल्याचे सांगत काळ्या बाजारात माल विक्री करणाऱ्यास सहकार्य करण्याच्या दृष्टीने पुरवठा विभागाने हात वर करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. तसेच आपण या मालाचे नमुने कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठवावे, असे पत्र पोलिसांना दिले. यानंतर पोलिसांनी यात गुन्हा दाखल करून तीन आरोपींना पकडले होते. जामीनही मिळाला. हे प्रकरण होऊन एक महिना झाला; मात्र तपासणीसाठी कृषी विद्यापीठाकडे हा माल पाठवून यात काय साध्य होणार? हा माल रेशनचा तपासणीत कसे कळेल? यामुळे पोलिसांनी हा माल तपासणीस अद्याप पाठवलेला नाही. यामुळे सुरुवातीला पुरवठा विभाग आणि आता पोलीस विभाग कारवाईबाबत कुचकामी धोरण अवलंबित असल्याने तपासाला गती मिळालेली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
-------
पोलिसांनी पकडलेला रेशनचे ६१०कट्टे मालाचा तपास एक महिन्यानंतरही जैसे थे असुन यात पुरवठा विभाग व पोलिसांचा मोठा फायदा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
------
पकडलेला रेशनचा गहु व तांदुळ आम्ही सुरूवातीला पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता. त्यानंतर तो माल आम्ही शासकीय गोदामात जमा केला. या मालाचे नमुने आम्ही अद्याप कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठवलेले नसून ते आता पाठवण्यात येतील. -धनंजय फराटे, पोलीस निरीक्षक, शहर ठाणे, माजलगाव.