कडा कृ. उ. बा समितीत सुविधांचा दुष्काळ; स्वच्छतागृह, पाणी, रस्ते, निवारा शेड नसल्याने कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:14+5:302021-01-16T04:38:14+5:30
कडा- ज्या कृ. उ. बा. समितीत जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशात जातो. याच कृ. ...
कडा- ज्या कृ. उ. बा. समितीत जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशात जातो. याच कृ. उ. बा. समितीत संचालक मंडळ व पणन महासंघाच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी कसलीच सुविधा मिळत नसल्याने मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे.
कृ. उ. बा. समितीत त्वरित सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली.
आष्टी तालुक्यातील कडा येथे कृ. उ. बा. समिती आहे. याच बाजार समितीमध्ये जिल्हा व परजिल्हा या ठिकाणावरून शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी घेऊन येतात. महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या बाजार समितीमध्ये आल्यावर शेतकऱ्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही.
या ठिकाणी शेतकरी शेती माल घेऊन आला, तर माल उघड्यावर ठेवावा लागतो. शेतकरी थकून आल्यावर आराम करण्यासाठी त्याला निवाराशेड नाही, स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुतारी नाही, त्याचबरोबर अंतर्गत सिमेंट रस्ते नसल्याने मातीचा फुफाटा मोठ्या प्रमाणावर आहे. संरक्षण भिंती, मुख्य गेटचे काम रखडल्याने मोकाट जनावरे त्रास देतात. अशा एक ना अनेक गैरसोयी व सुविधा नसल्याने शेतकरी लोकांची कुचंबणा होत आहे.
संचालक मंडळ व पणन महासंघाने याकडे दुर्लक्ष न करता ज्याच्या जिवावर ही बाजार समिती चालते. किमान त्यांना तरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
जनावरांसाठी असलेला पाण्याचा हौद कोरडेठाक
रविवारी या ठिकाणी आठवडी बाजार असतो. बाजारात गाय, बैल, म्हशी, शेळ्या ही जनावरे विक्रीसाठी लांबलांबून लोक आणतात. खरेदी करण्यासाठी देखील तेवढीच गर्दी असते, पण दिवसभर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा फोडावा लागतो. घरी पाणी पाजून बाजारात आणले की परत घरी गेल्यावरच त्यांना पाणी मिळते. मग एवढ्या थाटामाटात बनवलेल्या हौदात थोडे देखील पाणी ठेवता येत नसल्याने मुक्या जिवाशी देखील खेळले जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुविधांपासून कोसो दूर असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून संचालक मंडळाने लाखो रुपये खर्च करून कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालय बनवले. मग शेतकऱ्यांना सुविधा देताना दुजाभाव का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कडा कृ.उ.बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.