कड्याचा गावरान कांदा इंडोनेशियात; आवक वाढल्याने शेकडो मजुरांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 07:13 PM2018-02-09T19:13:24+5:302018-02-09T19:15:32+5:30
गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर गाड्यांची विक्रमी आवक होत आहे.
कडा ( बीड ): गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर गाड्यांची विक्रमी आवक होत आहे. आष्टीचा कांदा प्रथमच सातासमुद्रापार असलेल्या इंडोनेशियाच्या बाजारात गेला आहे. कांदा आवक वाढल्यामुळे शेकडो मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
आष्टी तालुक्यात पाच-सहा वर्षांपूर्वी पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील पुरता हतबल झाला होता. मागील वर्षी सर्वत्र दमदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शेतकर्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची लागवड केली. यावर्षी पहिल्यांदाच बाजारात गावरान कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.
सध्या गावरान कांदा उत्पादकांना कडयाच्या बाजारात प्रतिक्विंटल एक हजार रुपयांपासून अडीच हजारापर्यंत भाव मिळत असल्याने या आठवड्यात येथील बाजारपेठेत आष्टीसह जालना, दौंड, भूम, परंडा, करमाळा, गेवराई, शेवगाव, पाथर्डी, बेलवंडी, इत्यादी ठिकाणावरून कांद्याच्या गाड्या दाखल होत आहेत. शेकडो टन कांदा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. कांदा ठेवायला देखील जागा कमी पडत होती.
कांद्याची विक्रमी आवक झाल्याने परिसरातील दीडशे ते दोनशे महिला-पुरुष मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कडयाचा हाच कांदा परदेशात मागणी असल्यामुळे उत्तरप्रदेशसह आॅस्ट्रेलिया, दुबई, लंडन, सिंगापूर, इंडोनेशिया,श्रीलंका सारख्या देशाच्या बाजारात पाठवला असल्याचे कांदा व्यापारी बबलू तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बाजार समितीचाही लौकिक
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा हा उत्तम आणि चांगला गोलाकार मनमोहक असल्याने परदेशात याला मागणी आहे.येथे आवक होेणार्या कांद्याला वीस ते पंचवीस रु पये प्रतिकिला भाव तसेच आवकनुसार दरात बदल होतो.ग्रामीण भागातील ही मोठी बाजार समिती असल्याने परदेशात कांद्याची निर्यात होत असल्याने शेतकरी वर्गाला भावही चांगला मिळतो. त्यामुळे बाजार समितीचा लौकिक होत असल्याचे सचिव हनुमंत गळगटे यांनी सांगितले.
मजुरांच्या हाताला काम
बाजारात आष्टीसह विविध भागांतून गावरान कांद्याची प्रचंड आवक वाढल्यामुळे चांगल्या व दर्जेदार कांद्याची निवड करून ते गोणीत भरण्यासाठी शंभराहून अधिक मजुरांना दोनशे ते अडीचशे रुपये रोजगार मिळत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- भिमाबाई सुभाष सोनवणे, मजूर मुकादम