कामधेनू कोविड केअर सेंटर ठरतंय रुग्णांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:20+5:302021-06-11T04:23:20+5:30
आष्टी : तालुक्यातील धानोरा येथील कामधेनू कोविड केअर सेंटर आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून, धानोरा ...
आष्टी : तालुक्यातील धानोरा येथील कामधेनू कोविड केअर सेंटर आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून, धानोरा परिसरातील ४० कोरोनाग्रस्त रुग्ण सध्या येथे उपचार घेत आहेत. हे कोरोना सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव चव्हाण हे चोवीस तास येथे थांबून कुटुंबातील सदस्याप्रमाणे रुग्णांची काळजी घेत असल्याने आष्टी तालुक्यात या कोविड सेंटरची चर्चा होत आहे.
तालुक्यात महसूल आरोग्य व पोलीस प्रशासनाने लॉकडाऊन काळात योग्य खबरदारी घेतली तसेच नागरिकांनीही नियमांचे पालन केल्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तालुक्यातील अनेक कोविड सेंटरमधील रुग्ण संख्या कमी झाली आहे. आ. धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य नागरिकांना आधार दिला आहे. आ. धस यांनी माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांच्यावर धानोरा येथे कामधेनू कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून जबाबदारी दिली असून, त्यांनीही येथे चोवीस तास थांबून रुग्णांची काळजी घेत व आधार देत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट कोविड सेंटर चालविले आहे.
रुग्णांना सकाळी प्राणायाम व योगा शिकविला जातो. सकाळी आयुर्वेदिक काढा, चहा बिस्केट, नास्टा, दिवसातून दोन वेळेस रुग्णांच्या आवडीनुसार जेवण बनविले जाते. रुग्णांना व्हिटॅमिन मिळावेत यासाठी विविध प्रकारचे फळ, आहार, अंडी दिली जातात. येथील प्रशस्त व हवेशीर वातावरण, तसेच झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने रुग्ण आनंदी वातावरणात राहत आहेत. भारत काळे हे रुग्णांना प्राणायाम व योगाचे धडे देतात. प्रियांका काळे, निकाळजे, घोडके, आदी कर्मचारीही रुग्णांसाठी मेहनत घेतात. तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, डॉक्टर हे वेळोवेळी येथे भेट देऊन मार्गदर्शन करतात.
रुग्णांना कोविड सेंटरमध्ये नाही, तर कुटुंबातील व्यक्तींसोबतच आपण राहत असल्याचे येथील रुग्ण सांगतात. आष्टी तालुक्यातच नव्हे, तर बीड जिल्ह्यात कामधेनू कोविड केअर सेंटरची चर्चा होत आहे.
===Photopath===
100621\img-20210610-wa0221_14.jpg~100621\img-20210610-wa0222_14.jpg