अत्यल्प डांबर वापरून कानडीमाळी-लव्हुरी रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:22 AM2021-02-19T04:22:31+5:302021-02-19T04:22:31+5:30
विडा : केज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत सुरू असलेल्या केज-विडा या राज्य रस्त्यावरील कानडीमाळी ते लव्हुरी दरम्यान पाच किलोमीटर ...
विडा : केज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत सुरू असलेल्या केज-विडा या राज्य रस्त्यावरील कानडीमाळी ते लव्हुरी दरम्यान पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम अत्यल्प डांबर वापरून केले जात आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड ग्रामस्थांतून होत असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक करून गुत्तेदाराची पाठराखण सुरू केली आहे.
केज - विडा या राज्य मार्गावर येत असलेल्या कानडीमाळी ते लव्हुरी या दोन गावांमधील पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम हे केज येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. गतवर्षी निकृष्ट दर्जाचे बीबीएमचे काम सोडून दिलेल्या या रस्त्यावर काही महिन्यात खड्डे पडले होते. ते खड्डे थातूरमातूरपणे बुजून घेत गुत्तेदाराने रस्त्यावर साचलेल्या धुळीवरच डांबराचा वापर न करता खडी टाकून दबई केली जात आहे. साईडपट्ट्यांचे खोदकाम करणे आवश्यक असताना हे काम केलेले नसून, या कामात डांबर वापरले जात नसल्याने हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्यावर खाली डांबर न टाकता केवळ दीड ते दोन इंची खडी टाकली जात आहे. त्यावर बारीक चुरा टाकून दबाई केली जात आहे. त्यावर कारपेटचा थर टाकून लगेच डांबरीकरण केले जाणार आहे. मात्र, मजबुतीकरणच व्यवस्थित व मजबूत केले जात नसल्याने होणारे थातूरमातूर काम पावसाळ्यापूर्वीच पूर्णपणे उखडून जाणार आहे. या कामाबाबत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, तरीदेखील गुत्तेदाराने कामात सुधारणा न करता निकृष्ट काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा व गुणवत्ता गुण नियंत्रक विभागाकडून तपासण्याची मागणी होत आहे. या कामात सुधारणा न केल्यास सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या कामावर देखरेख करणारे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता व्ही. डी. कोळगे यांनी हे काम चांगले होत असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.