करुणा शर्मांचा जामीनही झाला; पण डिक्की उघडणारा अद्यापही मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:31+5:302021-09-22T04:37:31+5:30
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पती असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक झाली. सोळा दिवस ...
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पती असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक झाली. सोळा दिवस कारागृहात राहिल्यानंतर मंगळवारी जामीनही झाला. परंतु त्यांच्या गाडीची डिक्की उघडणारा व्यक्ती अद्यापही मोकाटच आहे. परळी पोलिसांकडून तपासात कसलीच गती नसल्याचे दिसते. त्यांच्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
करुणा शर्मा या ४ सप्टेंबर रोजी परळीत दाखल झाल्या होत्या. याचवेळी त्यांनी एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून परळी शहर ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने आणखी एक गुन्हा दाखल झाला. याचवेळी त्यांच्या गाडीची डिक्की उघडतानाचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांना जाणूनबुजून गुन्ह्यात अडकवल्याची चर्चा झाली. तसेच काही लोकांनी खोटा गुन्हा दाखल केला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. तर दुसऱ्या बाजूला शर्मा यांना १६ दिवस कारागृहात मुक्काम ठोकावा लागला. मंगळवारी त्यांना काही अटी घालून जामीन देण्यात आला. परंतु त्यांच्या गाडीची डिक्की उघडणारा पोलिसांना सापडलेला नाही. केवळ व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही, असे कारण सांगून परळी पोलीस वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
---
अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे शांत का?
एरव्ही चोरी, घरफोडी, दरोडा, खून, बलात्कार या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कसलाही पुरावा हाती नसताना बीड पोलीस शोधून काढतात. पण या प्रकरणात १६ दिवस उलटूनही व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती पोलिसांना सापडलेला नाही. केवळ व्हिडिओ सप्ष्ट नाही, असे सांगितले जात आहे. अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या बीड पोलिसांना हा व्यक्ती खरोखरच सापडत नाही की मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
---
काय म्हणतात पोलीस अधिकारी...
याबाबत पोलीस अधीक्षक आर. राजा यांना दोन वेळा भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु त्यांनी फोन घेतला नाही. तसेच सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा परत फोनही आला नाही. तर परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम म्हणाले, व्हिडिओ अस्पष्ट आहे. अद्याप कोणालाच संशयित म्हणून चौकशीसाठीही घेतले नाही. आमचा तपास सुरू आहे, असे सांगून वेळ मारून नेली.
---
आतापर्यंतच्या नाट्यमय घडामोडींचा लेखाजोखा
४ सप्टेंबर - करुणा शर्मा बीडमध्ये दाखल
५ सप्टेंबर - करुणा शर्मा परळीत, दिवसभर नाट्यमय घडामोडी, गुन्हा दाखल
६ सप्टेंबर - अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर; करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास पोलीस कोठडी
७ सप्टेंबर - अरुण मोरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
८ सप्टेंबर - करुणा शर्मांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज, सुनावणीसाठी १४ सप्टेंबर तारीख
१४ सप्टेंबर - न्यायाधीश रजेवर, जामीन अर्जावरील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
१८ सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद
२० सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण
२१ सप्टेंबर - करुणा शर्मा यांना सशर्त जामीन मंजूर