करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम शनिवारपर्यंत वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:05 PM2021-09-14T16:05:15+5:302021-09-14T16:05:58+5:30
दोन्ही आरोपी सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
अंबाजोगाई : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज मंगळवारी (दि.१४) सुनावणी होणार होती. मात्र, सदरील न्यायालयाच्या न्यायाधीश रजेवर असल्याने शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवार पर्यंत (दि.१८) पुढे ढकलण्यात आली आहे.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा आणि अरूण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोन्ही आरोपी सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
दरम्यानच्या काळात सुट्या असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी (दि.१४) सुनावणी होणार होती. सदरील प्रकरण न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर आहे. त्या सध्या रजेवर असल्याने शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवारी (दि.१८) ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे करुणा शर्मांचा कारागृहातील मुक्काम शनिवारपर्यंत वाढला आहे.