केकाणवाडीचा नाथा झाला फौजदार, गावकऱ्यांनी काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:01 AM2021-02-18T05:01:51+5:302021-02-18T05:01:51+5:30
आडस : येथून जवळच असलेल्या केकाणवाडी येथील सामान्य कुुटुंबातील नाथा केकाण या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या पोलीस ...
आडस : येथून जवळच असलेल्या केकाणवाडी येथील सामान्य कुुटुंबातील नाथा केकाण या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळविले. याबद्दल त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज तालुका भाजपाचे अध्यक्ष भगवान केदार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नमिता मुंदडा, केज पंचायत समितीचे उपसभापती ऋषिकेश आडसकर, श्रीकृष्ण महाराज चवार, शिवरूद्र आकुसकर, आडस ग्रामपंचायतीचे सदस्य शेख इसाक, काशिदवाडीचे सरपंच जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मुंदडा यांनी केकाणवाडीतील गावातील तरुण प्रशासकीय सेवेमध्ये जात असल्याबद्दल प्रशंसा केली. भगवान केदार म्हणाले, नुकताच निकाल लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वंजारी समाजाची ४२ मुले पात्र ठरली आहेत. ही अभिमानास्पद बाब असून तरुणांनी संधीच्या शोधात बसण्यापेक्षा स्वतः संधी निर्माण करावी, असे ते म्हणाले.
ऋषिकेश आडसकर म्हणाले, या गावातील तरुणांनी नाथा केकाण यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात यशाचा मार्ग निवडावा. यावेळी श्रीकृष्ण महाराज चवार यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन यांनी नाथा केकाण यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सुनील केकाण यांनी केले. सूत्रसंचालन शेख असाहबोद्दीन यांनी केले. गणेश केकाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच बबिता केकाण, उपसरपंच दत्तात्रय मुंडे, तुकाराम चाटे, चेअरमन फुलचंद केकाण, छत्रभुज केकाण, रमेश बप्पा केकाण, शरद चाटे, विष्णू चाटे, आश्रुबा केकाण, सुरेश केकाण, गणेश केकाण यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.