केंद्रेवाडी भूगर्भातील गूढ आवाजाने हादरली; ग्रामस्थांनी भीतीने रात्र जागून काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 06:52 PM2021-09-07T18:52:03+5:302021-09-07T18:54:59+5:30
आवाज पंचक्रोशीत दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे भुगर्भातून गूढ आवाज येऊ लागल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीय झाले आहेत.या घटनेची माहिती महसूल प्रशासनास प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचविल्या.व भूगर्भ शास्त्रज्ञांना या घटनेची माहिती दिली. मात्र या गूढ आवाजाच्या भीतीने ग्रामस्थांनी सोमवारची रात्र जागून काढली.
अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातुन गूढ आवाज येत आहेत. या आवाजाने ग्रामस्थ भयभीत झाले. आवाज सातत्याने येऊ लागल्याने या घटनेची माहिती केंद्रेवाडीच्या सरपंच योगिता बाळासाहेब केंद्रे यांनी प्रशासनास दिली. मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार विपिन पाटील व महसूलच्या पथकाने केंद्रेवाडी येथे जाऊन भेट दिली व परिसराची पाहणी केली. असे आवाज पंचक्रोशीत दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन
भुगर्भातून गूढ आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी कच्या घरात न थांबता पक्या घरात थांबावे.अश्या सुचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.तर या गूढ आवाजा संदर्भात भूगर्भ शास्त्रज्ञ यांना ही माहिती दिली असुन ते या भागाची पाहणी करण्यासाठी येत आहेत. असे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितले. तर ज्या ग्रामस्थांकडे पक्के घरे नाहीत अशा ग्रामस्थांना शाळेत राहण्याची सुविधा गावच्या सरपंच योगिता केंद्रे यांनी उपलब्ध करून दिली आहे.
३३ वर्षांपूर्वी ही आले होते असे गूढ आवाज
केंद्रेवाडी व परिसरातील गावांमध्ये अशा प्रकारचे गूढ आवाज ३३ वर्षांपूर्वी ही आले होते.त्या काळात अनेक जुनी घरे पडली होती.त्यानंतर १९९१ साली किल्लारी व परिसरात भुकंप झाला होता. असे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र काल पासुन पुन्हा असे आवाज येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसराची तात्काळ पाहणी करावी
सोमवारपासून भूगर्भातून गुढ आवाज येत असून मध्यरात्री मोठा आवाज झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गूढ आवाजा बाबत भूजल सर्व्हेक्षण अधिकारी यांना त्वरित पाहणी करण्यासाठी केंद्रेवाडी, येथे पाठवावे व उच्चस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
हेही वाचा -
- जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद
- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले
- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव