माजलगाव शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:23 PM2018-05-08T13:23:05+5:302018-05-08T13:23:05+5:30
खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे.
माजलगाव : खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
माजलगाव शहरातील संभाजी चौक ते मौलाना आझाद चौक हे अंतर दीड कि.मी.चे आहे. शहरातील हा मुख्य रस्ता असून रस्त्याच्या दुतर्फा व्यापारपेठ आहे. सदरील रस्त्यावर या अगोदर मोठया प्रमाणावर रस्ता व नालीच्या कामासाठी खर्च करण्यात आला. रस्त्याचे व नालीच्या कामाचे एकत्रित टेंडर निघालेले असताना देखील त्यावेळी संबंधित गुत्तेदाराने केवळ रस्त्याचेच काम केले ते देखील थातूरमातूर पध्दतीने व नाल्या तर केल्याच नाहीत. तेंव्हापासुन या रस्त्यावर खड्डे जागोजाग पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन रहदारी करणे धोक्याचे ठरत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. माजलगाव शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले असून, कल्याण -विशाखापट्टणम क्र. २२२ हा बायपास मार्गे गेला आहे तर दुसरा खामगाव- पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव मार्गे गेला असून त्याचे प्रयोजन शहरातून केलेले आहे. माजलगाव शहराचा विकास व्हावा या हेतुने येथील आ.आर.टी. देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. खामगाव-पंढरपूर रस्त्यावरील माजलगाव ते केज या संपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम हे ८ ते ९ महिन्यांपूर्वी सुरु झालेले आहे.
दरम्यान, माजलगाव शहरातील काम हे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही हे काम सुरु च झालेले नाही. सदरील रस्ता हा यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता त्यानंतर तो राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आला. त्यामुळे आता रस्त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही व शहरातील काम देखील एजन्सी पूर्ण करीत नसल्यामुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे.
हद्द खुणा केल्या पण अंतर किती सोडायचे ?
रस्त्याचे काम होणार म्हणून हद्द खुणा देखील करण्यात आल्या. परंतु मागील आठ ते नऊ महिन्यांपासून काम सुरु न झाल्याने नेमके काम कसे होणार आहे. तसेच हद्द खुणा केल्यापासून किती अंतर सोडायचे आहे, या बाबी स्पष्ट होत नसल्यामुळे याबाबत या रस्त्यावरील व्यापा-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेकांची बांधकामे देखील यामुळे थांबलेली आहेत.
पुढील महिन्यात काम सुरु होईल
तेलगाव-माजलगाव रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून, दुसरा टप्पा म्हणून माजलगाव शहराऐवजी आम्ही धारु र-केजच्या बाजुने काम सुरु केले ते काम देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पुढील महिन्यात माजलगाव शहरातील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरु वात करण्यात येईल.
- उदय भराडे, कार्यकारी अभियंता ,रस्ते विकास महामंडळ