मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:59 PM2024-08-26T16:59:51+5:302024-08-26T17:00:18+5:30
गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.
धारूर ( बीड) : खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गावंदरा गावाजवळ भरधाव टिप्परच्या ( क्र एम एच २१ बी एच १६०० ) धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. अपघातानंतर टिप्पर रस्त्याच्या बाजूला उलटून एका घरावर गेले. रामा सिताराम घुले (५०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.
धारूर तालूक्यातून गेलेला खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. एकट्या गावंदरा या गावाजवळ आजपर्यंत नऊ अपघात झाले असून आतापर्यंत पाच जणांचे बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज सकाळी अपघातात गावातील ५० वर्षीय रामा घुले यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले. महामार्गावर गतिरोधक बसवून सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, तहसीलदार सुरेश पाळवदे, सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी आंदोलनाची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलून घेत तात्काळ उपाययोजनेच्या सूचना केल्या. तसेच याबाबत लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.