कीर्तन महोत्सव घेणाऱ्या खटोड भावंडात प्रॉपर्टीवरून वाद; नातवाकडून आजीला धक्काबुक्की
By सोमनाथ खताळ | Published: November 9, 2022 02:07 PM2022-11-09T14:07:42+5:302022-11-09T14:08:42+5:30
सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांच्यावर भावाकडूनच गंभीर आरोप
बीड : मागील २० वर्षांपासून बीडमध्ये स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कीर्तन महोत्सव घेणारे सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांच्यावर त्यांचाच लहान भाऊ सुशील खटोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या आडाणीपणाचा फायदा घेऊन आणि आम्हाला अंधारात ठेवून प्रॉपर्टी घेतली. शिवाय बाहेर सामाजिक कार्याचा आव आणणारे गौतम हे स्वत:च्या आईला मध्यरात्रीच घराबाहेर काढतात. नातवाकडून माझ्या आईला धक्काबुक्की केली जाते, असे गंभीर आरोप सुशिल खटोड यांनी केले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांचे लहान भाऊ सुशील खटोड यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आई निर्मला खटोड, मुलगा आशिष खटोड हे देखील होते. धार्मिक व सामाजिक कार्य करताना आम्ही सोबत असतोत. परंतू गौतमने आम्हाला कोठेही पुढे येऊ दिले नाही. तसेच मी चौथी पास आहे. माझ्या अडाणीपणाचा फायदा घेऊन आणि आम्हाला अंधारात ठेवून प्रॉपर्टी मुलाच्या आणि स्वत:च्या नावे करून घेतली. मागील तीन वर्षांपासून माझ्यासह कुटूंबावर अन्याय होत आहे. परंतू बदनामीपोटी शांत होतो. परंतू आता हे असह्य झाले असून आता माझ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गौतमचा मुलगा माझी आई निर्मला यांना धक्काबुक्की करतो. गौतम बाहेर सामाजिक कार्याचा आव आणतो. परंतू प्रत्यक्षात घरात कोणालाच व्यवस्थित वागवत नाही. सासरकडील नातेवाईकांच्या जीवावर धमक्या देतो, असा आरोपही सुशिल खटोड यांनी केला आहे. परंतू केवळ बदनामीपोटी आपण पोलिसांत तक्रार दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
मंगळवारी सायंकाळी खटोड यांच्या एमआयडीसी भागातील घराच्या बाहेरच सुशिल खटोड आणि पुतण्या शुभम गौतम खटोड यांच्यात वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचे भांडण घरातील महिला सदस्य सोडवत आहेत. परंतू या प्रकरणात आपण तक्रार दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पण याबाबत सर्वांची विचार करून तक्रार करणार असल्याचे सुशिल खटोड म्हणाले.
कीर्तन महोत्सवात सहभाग नाही
मागील तीन वर्षांपासून मी आणि माझा मुलगा आशिष कीर्तन महोत्सवात सहभागी होत नाहीत. बाहेर एक आणि घरात दुसरेच वागायचे, हे ढोंग आम्हाला येत नाही. खटोड प्रतिष्ठाणचा मी पण पदाधिकारी आहे. परंतू यावेळीही मी त्यात सहभागी होणार नाही. आम्ही अनेकदा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतू गौतम कायम आम्हाला हीन वागणूक देत असल्याचा आरोपही सुशिल खटोड यांनी केला.
निर्मला खटोड म्हणतात...
दोन्ही मुले माझेच आहेत. मला अनेकदा त्रास झाला, पण मी बोलून दाखवले नाही. गौतम बाहेर चांगला वागतो आणि घरात त्रास देतो. मला मध्यरात्री घराबाहेर काढले. असे का? हा माझा प्रश्न आहे. प्रॉपर्टीमध्ये साधारण ७० टक्के गौतमच्या तर ३० टक्के सुशिलच्या नावे आहे. मला पैसा पाणी काही नको, फक्त मुलांनी एकत्र रहावे, एवढीच इच्छा असल्याचे निर्मला खटोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोप खोटे आहेत
मी आतापर्यंत त्याला खुप सांभाळून घेतलेले आहे. परंतू त्याच्यात सुधारणाच होत नाहीत. प्रॉपर्टी तो अर्धी मागत असेल पण ५१ टक्के द्यायला तयार आहे. त्याने केलेले आरोप खोटे आहेत. त्यात काहीही तथ्य नाही.
- गौतम खटोड, सामाजिक कार्यकर्ते बीड