बीडच्या खेळाडूंची एक ‘किक’ प्रतिस्पर्ध्याला भरवते धडकी; तायक्वांदोमुळे  जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:32 PM2018-09-04T18:32:37+5:302018-09-04T18:34:50+5:30

जागतिक तायक्वांदो दिवस : जिल्हाभर ५ हजारपेक्षा जास्त मुले घेताहेत धडे; बीडच्या खेळाडूंची एक ‘किक’ प्रतिस्पर्ध्याला भरवते धडकी

A 'kick' of Beed players thrills the opponent; Due to taekwondo the name of the district is bright across the country | बीडच्या खेळाडूंची एक ‘किक’ प्रतिस्पर्ध्याला भरवते धडकी; तायक्वांदोमुळे  जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल

बीडच्या खेळाडूंची एक ‘किक’ प्रतिस्पर्ध्याला भरवते धडकी; तायक्वांदोमुळे  जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात ५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी याचे प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५ राज्यस्तरीय स्पर्धातायक्वांदो खेळाच्या आरक्षणावर जिल्ह्यातील २८ खेळाडू आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

- सोमनाथ खताळ 

बीड : तायक्वांदो या खेळाबद्दल पूर्वी लोक अनभिज्ञ होते, हाच खेळ आता लोकप्रिय बनला आहे. जिल्हाभरात ५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी याचे प्रशिक्षण घेत आहेत. एवढेच नव्हे तर बीडच्या खेळाडूंनी जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर बीड जिल्ह्याचे नाव देश पातळीवर झळकावले आहे. बीडच्या चार खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. जागतिक तायक्वांदो दिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

जागतिक तायक्वांदो फेडरेशनने ४ सप्टेंबर १९७२ साली तायक्वांदो या खेळाला सुरूवात झाली. त्यानंतर बीडमध्ये २० मे १९९४ रोजी हा खेळ सुरू झाला. सुरूवातीला या खेळाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. सर्वजण या खेळापासून दुर पळत होते. परंतु जिल्ह्यातील प्रशिक्षकांची जिद्द आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे आज या खेळाने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. आता या खेळाला इतर खेळांप्रमाणेच मान्यता मिळाली असून नौकरी, शिक्षण व इतर ठिकाणी इतर खेळांप्रमाणेच गुण दिले जात आहेत.

सध्या बीडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. शालेय स्तरावरही याचे प्रशिक्षण दिले जाते. पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आज याचे प्रशिक्षण घेत आहेत. हाच धागा पकडून मागील काही वर्षांमध्ये जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धाही बीडच्या खेळाडूंनी गाजविल्या. सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट करून राज्यात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले. राज्यात इतर ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्येही बीडने बाजी मारलेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५ राज्यस्तरीय स्पर्धा
बीड जिल्हा क्रीडा संकुलावर शासन व तायक्वांदो असोसिएशनतर्फे आतापर्यंत पाच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच येथे निवड चाचणी घेण्यात आली. बीडमध्ये निवडलेल्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून बक्षिसे खेचून आणली.

कॉमनवेल्थमध्ये मिळवले पदक 
जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये जिद्द व चिकाटी असून आपण कशातच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. ज्या खेळाबद्दल माहिती नव्हती त्याच खेळात यश संपादन करून जिल्ह्याचे नाव देशात झळकविण्यात चार खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये दीक्षा बनकर, अविनाश पांचाळ, प्रियंका ढाकणे, शुभम बनकर यांचा समावेश आहे. दीक्षाने कॉमनवेल्थ या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तसेच १५० पेक्षा जास्त खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे.

७ खेळाडूंना शिष्यवृत्ती
तायक्वांदोमुळे ७ खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर माजी नगराध्यक्षा तथा प्राचार्या डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते ही शिष्यवृत्त खेळाडूंना दिली जाणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

२८ खेळाडू शासकीय सेवेत
तायक्वांदो खेळाच्या आरक्षणावर जिल्ह्यातील २८ खेळाडू आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. पोलीस, शिक्षण, आरोग्य, विद्यूत आदी विभागांचा समावेश आहे.

१५ खेळाडूंना उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडापटू हा पुरस्कार तायक्वांदो खेळाडू असलेल्या १५ जणांना मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनी याचे जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलेले आहे. पदकाप्रमाणे त्यांच्या बक्षिसाचे स्वरूप होते.

खेळाडूंचा अभिमान आहे
प्रत्येक खेळाडू चांगला कसा घडविता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. बीडच्या खेळाडूंमधील जिद्द पाहून आनंद होतो. देशपातळीवर बीडचे नाव पोहचल्याने मला खेळाडूंचा अभिमान आहे. दर्जेदार स्पर्धा, प्रशिक्षण केंद्र व सुविधा देण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करेल. 
- अविनाश बारगजे, राष्ट्रीय प्रशिक्षक तथा अध्यक्ष, तायक्वांदो असो. आॅफ बीड जिल्हा

Web Title: A 'kick' of Beed players thrills the opponent; Due to taekwondo the name of the district is bright across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.