भल्या पहाटे घरात घुसून आजोबांसमोर अल्पवयीन नातीचे केले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:41 PM2022-11-25T12:41:40+5:302022-11-25T12:43:12+5:30
आजोबांनी आरडा-ओरडा केला असता आजूबाजूची लोक जमली. मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन फरार झाला होता.
दिंद्रुड ( बीड) : आजोबासमोरच अल्पवयीन नातीचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगाव येथे घडली. या प्रकरणात दिंद्रुड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगावात बुधवारी रात्री जेवणानंतर आजोबा दोन नाती आणि एका नातूसह झोपले होते. गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान महादेव सुखदेव सुरवसे हा तरुण घरात घुसला. आत झोपलेल्या पंधरा वर्षीय नातीला महादेवने ओढत बाहेर नेत रस्त्यावरील चारचाकी गाडीत बळजबरी बसवून अपहरण केले. आजोबांनी आरडा-ओरडा केला असता आजूबाजूची लोक जमली. मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन फरार झाला होता.
या अल्पवयीन मुलीचे आई-वडील कर्नाटक राज्यात उसतोडीसाठी गेलेले होते. घरात केवळ वृद्ध आजोबा असल्याचा गैरफायदा घेत आरोपी महादेव सुखदेव सुरवसे याने आपल्या डोळ्यांदेखत नातीचे अपहरण केल्याची तक्रार 65 वर्षीय आजोबांनी दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत गुरुवारी रात्री दिली.
दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी बाभळगाव गाठत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी दिंद्रुड पोलिसांकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच डीपीआयचे माजलगाव तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. दिंद्रुड पोलीस ठाणे गाठत या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.