कांदा लागवडीसाठी शेतात गेलेली १५ वर्षीय मुलगी परतलीच नाही; दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 03:41 PM2021-10-06T15:41:17+5:302021-10-06T15:46:06+5:30
पोलिसांनी स्वतंत्र पथक नियुक्त करून मुलीचा तपास सुरु केला आहे
कडा ( बीड ) : शेतात कांदा लागवड करण्यासाठी काही महिलांच्या टोळीत गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी ३ ऑक्टोबर पासून बेपत्ता असून मुलीच्या वडिलांनी अंभोरा पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गावातीलच इतर महिलासोबत शेतात कांदा लागवड करण्यासाठी नियमित जात असे. ३ आॅक्टोबर रोजी शेतात कामासाठी गेलेली मुलगी सायंकाळी घरी परतली नाही. यानंतर नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी टोळीतील एक महिला व शेतात घेऊन जाणारा रिक्षाचालक तरूण या दोघांवर अपहरणाचा संशय व्यक्त करत अंभोरा पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही संशयित आरोपी फरार आहेत. स्वतंत्र पथक नियुक्त करून मुलीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी दिली आहे.
मोठी बातमी ! कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध
६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; जळगाव रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र