खून करून मृतदेह टाकला कोरड्या विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:13 AM2019-06-28T00:13:52+5:302019-06-28T00:14:27+5:30
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरुवारी पहाटे घरात घुसून इसमाला चारचाकी गाडीत बसवून खून केला व मृतदेह कोरड्या विहिरीत टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
कडा : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरुवारी पहाटे घरात घुसून इसमाला चारचाकी गाडीत बसवून खून केला व मृतदेह कोरड्या विहिरीत टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. छगन उर्फ मेहमान लाजिम काळे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे ही घटना आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वाटेफळ) येथील शिवारात घडली.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वाटेफळ), येथील गायरानात छगन उर्फ मेहमान लाजिम काळे हे आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गुरुवारी पहाटे चारचाकी गाडीत चार महिला व चार पुरूष यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन छगन उर्फ मेहमान लाजिमा काळे यांना जिवे मारण्याच्या हिशोबाने दबा धरून बसले होते. पहाटे घरात घुसून काळे यांना पकडून बळजबरीने चारचाकी गाडीत बसवून त्यांना सुनसान ठिकाणी घेऊन गेले व त्यांचा खून करुन मृतदेह हातोळा रोडवरील एका कोरड्या विहिरीत टाकला व मारेकरी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. व खूनाच्या अनुषंगाने तपास काही सुगावा मिळतो का याचा तपास केला. दरम्यान, मयताची पत्नी रेखा मेहमान काळे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळी आष्टीचे पोलीस उपअधीक्षक विजय लगारे,अंभोरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करत आहेत.
मयताची जिवाला धोका असल्याची ठाण्यात तक्रार अर्ज
खून झालेल्या छगन काळे याने आपल्या जिवाला धोका असून, जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा अर्ज अंभोरा पोलीस ठाण्यात दिनांक १८ जून रोजी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
त्यानुसार अंभोरा पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कार्यवाही केली असती तर ही घटना टळू शकली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
तसेच वरिष्ठांनी कार्यवाही न करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.