शेतीच्या वाटणीवरून वडिलांवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:54+5:302021-06-05T04:24:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शेतीच्या वाटणीवरून वडिलांना बेदम मारहाण करून चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतीच्या वाटणीवरून वडिलांना बेदम मारहाण करून चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथे घडली.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, बाभळगाव येथे बालाजी गणपत सोनवणे यांची जमीन आहे. ही जमीन त्यांचा मुलगा कानिफनाथ हा अनेक दिवसांपासून वाटून मागत होता; परंतु वडिलांनी जमीन नावावर करून देण्यास नकार दिला होता. दरम्यान, २७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वडील बालाजी सोनवणे हे घरी बसले होते. यावेळी तेथे त्यांचा मुलगा कानिफनाथ आला आणि वडिलांंना म्हणाला, तू शेतजिमनीची वाटणी करतोस की नाही. सर्व जमीन माझ्या नावावर कधी करणार, असा सवाल केला. यावेळी वडिलांनी वाटणीस नकार दिला. याचा रागा आल्याने कानिफनाथ याने वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. यावेळी त्याने वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. चाकूहल्ल्यात वडील बालाजी सोनवणे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, वडील बालाजी गणपत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मुलगा कानिफनाथ याच्याविरुद्ध ३ जून रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक बांगर करीत आहेत.