यूट्यूबवरचे ज्ञान गुन्हेगारीत; सहावी पास तरुण अवघ्या पाच मिनिटांत बदलायचा मोबाईल IMEI
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:15 PM2022-09-06T12:15:37+5:302022-09-06T12:16:01+5:30
यूट्यूब पाहून अवगत केले तंत्र, पैशाच्या मोहाने गुन्हेगारीकडे
- संजय तिपाले
बीड: त्याचे शिक्षण जेमतेम सहावी उत्तीर्ण. मात्र, तंत्रस्नेहीला लाजवेल, अशा सफाईदारपणे त्याची बोटे लॅपटॉपवर खेळतात. यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून आयएमईआय बदलण्याचे तंत्र त्याने अवगत केलेले, पण पैशांचा माेह त्यास गुन्हेगारीकडे घेऊन गेला अन् एक दिवस कायद्याच्या कचाट्यात अडकलाच. मोहसीन खान रफिक खान नाव त्याचं.
चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय बदलून विक्री करणाऱ्या टोळीचा ३ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षकांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेने मिळून पर्दाफाश केला.
मोहसीन खान रफिक खान (वय २५, रा. इस्लामपुरा, पेठ बीड), फारुक युसूफ पठाण (३९, रा. शहेनशाह दर्ग्याजवळ, पेठ बीड), अब्रार शरीफ शेख (३०, रा. दिलावरनगर, पेठ बीड) व अफरोज नजीर शेख (३२, रा. भालदारपुरा, पेठ बीड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक संजय तुपे यांच्या पथकांनी ३ रोजी सायंकाळी पावणेसात वाजता मोहसीन खान याच्या घरी धाड टाकली.
यावेळी मोहसीन आयएमईआय बदलण्याचे काम करत होता, तर बाजूला फारुक पठाण बसलेला आढळला. खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या साखळीतील दोन मोबाइल शॉपीचालकांची नावेही त्यांनी सांगितली, त्यानुसार त्यांनाही पोलिसांनी उचलले. चारही आरोपींकडून एक लॅपटॉप, ४६ मोबाइल असा एकूण ४ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सध्या चौघेही पेठ बीड पोलिसांच्या कोठडीत आहेत.
पोलिसांना करून दाखविले प्रात्यक्षिक
पोलिसांनी धाड टाकली तेव्हा मोहसीन आयएमईआय बदलण्याचेच काम करत होता. तेथे आढळलेल्या दोन मोबाइलचे लॅपटॉपवर आयएमईआय कसे बदलतात, याचे प्रात्यक्षिक त्याने पोलिसांना करून दाखवले. अवघ्या पाच मिनिटांत तो एका मोबाइलचा आयएमईआय बदलतो. त्याचे हे तंत्र पाहून पोलीस चकित झाले.
विक्री केलेल्या मोबाइलच्या आयएमईआयचा असाही वापर...
अब्रार शेख व अफरोज शेख हे मोबाइल शॉपी चालवितात. जुने मोबाइल खरेदी- विक्रीचाही त्यांचा व्यवसाय आहे. चोरीच्या मोबाइलवर बनावट आयएमईआय टाकण्यासाठी विक्री केलेल्या जुन्या मोबाइलवरील आयएमईआयची यादी ते मोहसीन खानला पाठवत, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
फारुकचे मोबाइल चोरांमध्ये नेटवर्क
मोहसीन खान हा एक आयएमईआय क्रमांक बदलून बनावट क्रमांक टाकण्यासाठी दोनशे रुपये शुल्क घेत असे. फारूक पठाण याचे गांधीनगरातील मोबाइल चोरांमध्ये नेटवर्क असून तो चोरीचे मोबाइल आणून मोहसीनला देत असे. आयएमईआय क्रमांक बदललेल्या मोबाइलची विक्री अब्रार शेख व अफराेज शेख हे शॉपीचालक करत, असे निष्पन्न झाले.
मोबाइल चोरी करण्यापासून ते आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री करण्यापर्यंतचा कारनामा ही टोळी करत असे. या कारवाईने ही साखळी ब्रेक झाली आहे. मात्र, मोबाइल चोरांचा शोध सुरूच आहे. आयएमईआय बदलण्यासाठी यू ट्यूबवरील व्हिडिओंचा आरोपीने आधार घेतल्याचे समोर आले आहे.
- सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड