अंबाजोगाई तालुक्यात कोविड मृत्यूचा दर घसरला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:07+5:302021-04-28T04:36:07+5:30
६५,५१० जणांची झाली तपासणी; ८,४६८ रुग्णांना लागण तर ६,२८५ रुग्ण कोविड मुक्त होऊन परतले घरी; २,११७ रुणांवर उपचार सुरू ...
६५,५१० जणांची झाली तपासणी;
८,४६८ रुग्णांना लागण तर ६,२८५ रुग्ण कोविड मुक्त होऊन परतले घरी; २,११७ रुणांवर उपचार सुरू
अंबाजोगाई :
अंबाजोगाई तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या फेजमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असली तरी कोविडमुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा आकडाही समाधान देणारा आहे. अंबाजोगाई तालुक्यात आजपर्यंत कोविडचे ८,४६९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून, त्यापैकी ६,२८५ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत.
कोविडमुळे तालुक्यात आजपर्यंत १६३ जणांचे निधन झाले असून, १२ एप्रिल रोजी २.०२ टक्के असलेला मृत्यूदर घसरून १.९२ टक्क्यांवर आला आहे. सध्या १,२५३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब लोमटे यांनी दिली आहे.
अंबाजोगाई तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात २४ एप्रिल २१ अखेरपर्यंत कोविड रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या फेजमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्यामुळे आणि आठ-पंधरा दिवसातून एखादे दिवशी मृतांचा मोठा आकडा आला आणि तो प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाला की सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णांची सर्व सकारात्मक माहिती पुढे येणे गरजेचे आहे.
८,४६८ रुग्णांना झाली होती बाधा
अंबाजोगाई तालुक्यात आजपर्यंत कोविडचे ८,४६९ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ६,२९५ रुग्णांवर प्रभावी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोविडमुळे आजपर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ८७ रुग्ण ग्रामीण भागातील तर ७६ रुग्ण हे शहरी भागातील आहेत. कोविड रुग्णांचा मृत्यूदर हा १.९२ टक्के एवढा आहे.
६,२८५ रुग्ण कोविडमुक्त
अंबाजोगाई तालुक्यातील आजपर्यंत ६,२९५ रुग्ण कोविडमुक्त होऊन आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २,६६८ रुग्ण तर शहरी भागातील ३,६२७ रुग्णांचा समावेश आहे.
२,१७४ रुग्णांवर उपचार सुरू
अंबाजोगाई तालुक्यातील २,१७४ रुग्णांवर सध्या प्रभावी उपचार सुरू असून, यामध्ये १२५३ ग्रामीण भागातील रुग्णांचा तर ९२१ शहरी भागातील रुग्णांचा समावेश आहे.
१४७६ जण होम आयसोलेशनमध्ये
कोविडच्या दुसऱ्या फेजमध्ये सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी आलेल्या ८४८ जणांना तर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी आलेल्या ६२८ जणांना होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तालुक्यात सध्या १,४७६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
६३,५१० लोकांच्या तपासण्या
कोविडची लक्षणे असलेल्या ६३,५१० लोकांच्या तपासण्या आजपर्यंत करण्यात आल्या आहेत. यापैकी ३८,१२४ जणांच्या ॲन्टिजन तर २५,३८६ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांवर तत्काळ प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब लोमटे यांनी दिली.