कोविड काळ हा असंघटित कामगारांसाठी अंधारयुगच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:14+5:302021-07-30T04:35:14+5:30
बीड : जगावर आलेले कोरोनारूपी संकट मार्च-२०२० पासून भारतात आले. यामुळे केलेल्या लाॅकडाऊनचे सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाले. ...
बीड : जगावर आलेले कोरोनारूपी संकट मार्च-२०२० पासून भारतात आले. यामुळे केलेल्या लाॅकडाऊनचे सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाले. असंघटित क्षेत्रातील तसेच रोजंदारीवर काम करणारा कामगार अक्षरशः हताश झाला. कोरोनाने त्यांचा रोजगार हिरावला. त्यांच्यासाठी कोरोना काळ म्हणजे एक प्रकारचे अंधारयुगच होते, असे प्रतिपादन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डाॅ. वाल्मीक सरवदे यांनी केले.
बलभीम महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने ‘कोरोना महामारीचा असंघटित क्षेत्र व रोजंदारी कर्मचाऱ्यांवर झालेला परिणाम’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र पार पडले. उद्घाटक म्हणून डॉ. सरवदे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वसंत सानप हे होते, तर उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. सरवदे यांनी कोविडमुळे संपूर्ण जगातील विविध क्षेत्रांवर कसा प्रतिकूल परिणाम झाला, याची मांडणी करून भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानावर भाष्य केले. डॉ. वसंत सानप म्हणाले, कोरोनाने जगातील सर्व क्षेत्रांना प्रभावित केले असून, अजूनही हे संकट दूर झाले नाही. भारताच्या इतिहासातील सर्वांत वाईट काळ म्हणून कोरोना काळ गणला जाईल, असे ते म्हणाले.
पहिल्या सत्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख डाॅ. सय्यद अझरुद्दीन यांनी कोविडमुळे असंघटित क्षेत्रावर कशा पद्धतीने आर्थिक संकट निर्माण झाले, याचा आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात हैदराबाद येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. कनकीपती राव यांनी कोविडमुळे सर्वांत जास्त हानी रोजंदारी कामगारांची झाली. कसलेही काम नसल्याने त्यांना उपाशीपोटीही राहावे लागल्याचे नमूद केले. तिसऱ्या सत्रात ओरिसा येथील रामदेवी महिला विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे प्रा.डाॅ. सबतकुमार दिगल यांनी कोविड काळात छोट्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे जीवन खूप वाईट होते. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट केले. समारोपप्रसंगी उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते म्हणाले, कोविडने समाजातील सर्व घटकांना प्रभावित केले असून सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे.
प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एन.बी. मुदिराज यांनी केले. डाॅ. वैशाली कुटे यांनी आभार मानले. या वेबिनारला देशभरातून १७० प्राध्यापक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी डाॅ. भारत दहे यांच्यासह वाणिज्य विभागाच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
290721\29bed_8_29072021_14.jpg