कोविडच्या वाढत्या रुग्णसेवेचा स्वारातीच्या डॉक्टरांवर ताण; कोविड आयसीयु तत्काळ सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:23+5:302021-02-24T04:34:23+5:30
अंबाजोगाई शहर आणि परिसरातील गावात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर कोविड सेंटर बंद असल्यामुळे सर्वच रुग्णांना ...
अंबाजोगाई शहर आणि परिसरातील गावात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर कोविड सेंटर बंद असल्यामुळे सर्वच रुग्णांना स्वारातीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे लागत आहे. या रुग्ण सेवेचा ताण स्वारातीच्या मेडिसीन विभागातील डाॅक्टरांवर येत आहे.
बीड जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढीमध्ये अंबाजोगाई तालुका सध्या आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातील कोविड रुग्णांवरील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटर आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर आघाडीवर आहे. सध्या स्वारातीच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या ७०वर जाऊन पोहोचली आहे. १५० रुग्ण क्षमता असलेल्या लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये २९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
मध्यंतरी कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर लोखंडी सावरगाव व स्वारातीच्या कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय स्टाफ शासनाच्या निर्देशानुसार कमी करण्यात आला होता. मात्र, कोविड रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढत असतांना या रुग्ण सेवेचा ताण आता स्वारातीचे कोविड केअर सेंटर सांभाळणाऱ्या मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांवर येत आहे.
स्वारातीच्या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या कोविडच्या ६३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. स्वारातीच्या कोविड केअर सेंटरचा रुग्णसेवेचा संपूर्ण भार हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागावर आहे. या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना मेडिसीन विभागाची ओपीडी, महिला आंतररुग्ण कक्षाचे दोन कक्ष, पुरुष विभागाचे दोन कक्ष, मेडिसीन विभागाचे आयसीयु आणि तत्काळ उपचार कक्षात येणारे आकस्मिक रुग्ण तपासणी आणि उपचार पध्दतीवर नियंत्रण ठेवावे लागते.
अंबाजोगाईत आज १९ नवे रुग्ण
अंबाजोगाई तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, आज १९ रुग्णांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. १९पैकी १० रुग्ण नवीन असून, ९ रुग्ण जुन्या रुग्णांच्या सहवासात आलेले आहेत. हे सर्व रुग्ण आता स्वारातीच्या आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणार असल्यामुळे या दोन्ही सेंटरच्या रुग्णांत वाढ होणार आहे.
कोविडचे आयसीयु बंद...!
कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतांना स्वारातीमधील कोविडचे आयसीयु बंद असल्यामुळे अनेक रुग्ण दगावत असल्याचे दिसत आहे. तेंव्हा कोविडचे आयसीयु तत्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दोन कोविड केअर सेंटर सुरू
अंबाजोगाई शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असतांना रुग्णसंख्या वाढत जाईल तसतशी रुग्णसेवा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या लोखंडी सावरगाव आणि स्वारातीचे कोविड केअर सेंटर अशी दोन कोविड केअर सेंटर सुरू आहेत.
- डॉ. बालासाहेब लोमटे,
तालुका आरोग्य अधिकारी, अंबाजोगाई.
आयसीयु सुरू करण्याचे प्रयत्न सुरू
कोविडची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मध्यंतरी स्वारातीच्या कोविड केअर सेंटरचे आयसीयु बंद करण्यात आले होते. मात्र अलिकडील काही दिवसात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आयसीयु सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून आयसीयु सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
-
डॉ. राजेश कचरे,
उपअधिष्ठाता, स्वाराती वै. महाविद्यालय