कृषी विज्ञान केंद्राचा महिला शेतकरी मेळावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:30 AM2021-02-07T04:30:51+5:302021-02-07T04:30:51+5:30
अंबाजोगाई : दिनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘कृषीपूरक उद्योग’ या विषयावर महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन ...
अंबाजोगाई : दिनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘कृषीपूरक उद्योग’ या विषयावर महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्पप्रमुख, दिनदयाल शोध संस्थान, बीड), श्रद्धा देशमुख (संचालक, उत्कर्ष लर्निंग सेंटर, सगरोळी, जिल्हा नांदेड), माधुरी रेवणवार (शास्त्रज्ञ, गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी), संध्या कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या, औरंगाबाद), डॉ. प्रतिभा मिसाळ (मधुमेहतज्ज्ञ, लातूर) व डॉ. सौरभ शर्मा (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शर्मा यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना सांगितले की, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर नेहमीच भर देण्यात येत आहे. महिलांनी शेतीसोबतच कृषीपूरक व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावा, त्याची माहिती घेऊन उद्योगांमध्ये यश संपादन करावे, यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. ‘मधुमेह समज-गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मिसाळ म्हणाल्या की, शरीरात इन्सुलिन महत्त्वाचा घटक आहे. इन्सुलिनच्या असमतोलामुळे मधुमेह हा आजार होतो. मधुमेही व्यक्तीने औषधांसोबत व्यायाम व आहाराची पथ्ये पाळली पाहिजेत. गृहविज्ञान शास्त्रज्ञ रेवनवार यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा या महिला आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रस्थानी आहेत. प्रत्येक महिलेला अर्थार्जन करणे आज गरजेचे झाले आहे. त्यामुळे शेतीसोबतच इतर जोडधंदा करणे आवश्यक आहे.
संध्या कुलकर्णी यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, महिलांनी स्वतःच्या आवडीनुसार उद्योग सुरू करावे. ग्रामीण भागातील महिला खूप मेहनत घेतात. माझ्या गावात राहून मी काय उद्योग करू शकते, याचा त्यांनी विचार केला पाहिजे.
या मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक श्रद्धा देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी सोयाबीन प्रक्रियेपासून उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रिया यंत्र मिळाले. जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी केली. उत्कर्ष लर्निंग सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त महिला प्रशिक्षण घेतात. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो.
या मेळाव्याचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना केंद्राला वारंवार भेट देण्याचे आवाहन केले. केंद्राने उपलब्ध केलेल्या संसाधनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रातील गृहविज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी केले तर कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. केज, अंबाजोगाई व परळी तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.