बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ
By सोमनाथ खताळ | Published: August 29, 2024 07:37 PM2024-08-29T19:37:57+5:302024-08-29T19:38:36+5:30
विधानसभा राजकारण : एका पुतण्याला घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी चूल
बीड : जिल्ह्यात सध्या क्षीरसागर काका-पुतण्यांचा राजकीय वाद राज्याला परिचित आहे. बीड विधानसभेसाठी एकाच कुटुंबातील तिघे इच्छुक आहेत. यामध्ये आ. संदीप क्षीरसागर यांना शरद पवार तर डॉ. योगेश क्षीरसागर यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ आहे. सध्या तरी बीडमध्ये भावा-भावांतच रेस असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला काका जयदत्त क्षीरसागर मात्र आपल्या एका पुतण्याला घेऊन वेगळी चूल मांडली असून सध्या तरी 'एकला चलो रे' च्या भूमिकेत आहेत.
राज्यात राजकीय घडामोडी झाल्यानंतर बीडमध्येही याचे परिणाम जाणवले. आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहिले तर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अजित पवार गटात एन्ट्री केली. त्यामुळे काका-पुतण्या असे राजकीय वातावरण तयार झाले. सध्या हे दोघेही भाऊ मतदार संघात सक्रिय आहेत. आपल्यालाच बीडचे तिकीट मिळेल, या आशेने प्रत्येकजण धावाधाव करत आहे.
बीडची जागेवर राष्ट्रवादी, शिवसेनेचा दावा
बीडची जागा ही अनेक वर्षांपासून शिवसेनेची आहे. त्यामुळे यावेळी ती आम्हालाच मिळेल, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले होते. तर बीडमधील रनिंग आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे ज्यांचा आमदार त्यांची जागा, असा निकष लावून बीडची जागा आमचीच असेल, असा दावा अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी केला होता. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी एक शिष्टमंडळही अजित पवारांना भेटले होते.
काका सोबत एक पुतण्या
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ दोन पुतण्यांनी सोडली. परंतु अजूनही एक पुतण्या त्यांच्या सोबतीला आहे. आ. संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ व बीड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे काकाशी जवळीक साधून आहेत. बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात हेमंत यांची व्यासपीठावर पहिल्या रांगेत उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत शिवसेनेने नाते ताेडल्यावर ते अजूनही कोणत्याच पक्षात नाहीत.
अजित पवार गटाकडून कोण इच्छुक?
बीड विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यानंतर बळीराम गवते, तय्यब शेख यांनीही संपर्क वाढविला आहे. शरद पवार गटाकडून आ. संदीप क्षीरसागर वगळता इतर कोणीही फारसे सक्रिय नसल्याचे दिसते. त्यामुळे बीडच्या विधानसभेत क्षीरसागर भावांतच फाईट होण्याची दाट शक्यता आहे.