कुंडलिक खांडे-अनिल जगताप दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख; दोघांनाही व्हायचंय बीडचा आमदार
By सोमनाथ खताळ | Published: January 25, 2024 04:25 PM2024-01-25T16:25:02+5:302024-01-25T16:26:20+5:30
दोघांनीही ताणला 'बाण'; पत्रकार परिषदेतूनच केली निवडणूक लढविण्याची घोषणा
बीड : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यात शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्येच चढाओढ लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून बाहेर पडताना अनिल जगताप यांनी आपणच बीड विधानसभा लढविणार असे ठामपणे सांगितले होते. त्यानंतर आता मंगळवारी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनीही आपणच बीडसाठी उमेदवारी मागणार असून ते जिंकूनही दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊनच उमेदवारीची घोषणा केली आहे. आता ही जागा नेमकी मिळते कोणत्या पक्षाला? यावरही पुढील घडामोडी असणार आहेत.
काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक लागेल. त्या अनुषंगाने हे सर्वच पक्ष तयारी करत आहेत. त्यानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. जिल्ह्यात लोकसभेसाठी युतीकडून उमेदवार अंतिम समजले जात असले तरी विधानसभेत मात्र इच्छुकांची गर्दी होणार असल्याचे चित्र सर्वच विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. यात बीडही अपवाद नाही. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिवसेनेत आलेले अनिल जगताप यांना मंगळवारी जिल्हाप्रमुख करण्यात आले. ठाकरे गट सोडताना जगताप यांनी कोणत्याही परिस्थितीत बीड विधानसभा लढणारच, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता मंगळवारी कुंडलिक खांडे यांनीही बीड विधानसभेसाठी दावा केला आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागणार असून बीडला विधानसभा जिंकून दाखवू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. दरम्यान, खांडे आणि जगताप हे दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. दोघांनाही बीड विधानसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु पक्ष या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार? हा प्रश्न आहे.
बीडची जागा शिवसेनेकडे?
आतापर्यंत बीडची जागा ही शिवसेनेला राखीव असायची. परंतु यावेळी युतीकडून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडूनही दावा केला जात आहे. जर ही जागा शिवसेनेला सुटली तरच खांडे किंवा जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. जर बीडची जागा भाजपला सुटली तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उमेदवार असतील. तसे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वीच मस्के यांची घोषणा केली होती. राष्ट्रवादीला मिळाली तर डॉ. योगेश क्षीरसागर, बळीराम गवते हे दावेदार समजले जात आहेत. जयदत्त क्षीरसागर आणि शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे यांनी अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही.
२०१९ चा उमेदवार मीच होतो, पण...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने मलाच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. मीच उमेदवार अंतिम होतो. परंतु ऐनवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश झाला आणि मला माघार घ्यावी लागली. तरीही पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. आता २०२४ साठी देखील मी इच्छुक असून तयारी करत आहे. पक्ष माझ्या कामाची दखल घेऊन उमेदवारी देईल, असा विश्वास असल्याचेही खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.