सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' ला पुरस्कार; मराठवाड्यातील कलाकारांच्या कष्टाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 04:58 PM2022-02-02T16:58:57+5:302022-02-02T17:02:49+5:30

गॉडफादर नसताना केवळ कलेच्या प्रती निष्ठा राखत आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.

'Lachchi' got Award at Singapore's World Film Carnival; Notice the hard work of the artists in Marathwada | सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' ला पुरस्कार; मराठवाड्यातील कलाकारांच्या कष्टाची दखल

सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' ला पुरस्कार; मराठवाड्यातील कलाकारांच्या कष्टाची दखल

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड ) : मराठवाड्यातील माजलगाव तालुक्यातील कलाकारांनी एकत्र येत बनवलेला 'लच्छी' लघुपट सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल' मध्ये अव्वल ठरला आहे. या लघुपटास मानाचा क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड मिळाला आहे. असंख्य अडथळ्यावर मात करीत माजलगाव सारख्या छोट्या शहरात राहून दिग्दर्शक ॲड.सतिष धुताडमल, लेखक आर. प्रकाश, कला दिग्दर्शक विष्णू उगले व निर्मिती व्यवस्थापक रंगा अडागळे यांनी 'पायपीट फिल्म्स् प्रोडक्शन' खाली सातत्याने वैविध्यपूर्ण लघुपटांची निर्मिती केलेली आहे. या क्षेत्रात गॉडफादर नसताना केवळ कलेच्या प्रती निष्ठा राखत आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.

जानेवारी २०२२ मध्ये त्यांचा महत्त्वकांक्षी 'लच्छी' नावाचा मराठी लघुपट विविध फिल्म् फेस्टिवल्सला पाठविण्यात आला. गेल्या २० दिवसांपासून या फिल्मची देशातील विविध राज्यातील फिल्म फेस्टिवल्स स्पर्धेत निवड झाली, पारितोषिके देवून सन्मानही झाला. त्यांच्या या लघुपटाने 'आयकॉनीक शॉर्ट सीने ॲवार्ड '- २०२२ या फेस्टिवल्स मध्ये 'सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट' तसेच 'सर्वोत्कृष्ट विचार करायला लावणारा चित्रपट' हा किताब जिंकला आहे. तसेच 'चलचीत्र रोलींग अवार्डस्-२०२२' या फेस्टीवल मध्ये देखील 'बेस्ट क्रियेटिव आर्ट फिल्म' म्हणून 'लच्छी' ला सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच मानाच्या अशा सर्व भाषीक 'फिल्मशोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स' (FIFF -2022) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अंतीम फेरिसाठी 'लच्छी' पात्र ठरला आहे. 

यासोबतच सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' या लघुपटाची निवड झाली. यानंतर अनेक टप्पे पार पाडत लघुपट अंतिम फेरीत दाखल झाला. येथे 'लच्छी' ला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसिद्ध फिल्म फेस्टीवलमध्ये जगभरातून आलेल्या लघुपटांसोबत स्पर्धा करत 'लच्छी' ने हे यश मिळवले आहे. यात स्नेहल मुळे, सौरभ धापसे, गणेश लोहार, सुरेखा डोंगरदिवे, स्मिता लिमगावकर, अन्नु पठाण, नितीन भागवत, सुरेश सुंबरे, भागवत माने व यश धुताडमल आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. तसेच तंत्रज्ञ म्हणून अमर देवणे आणि मयुर भिसे यांनी काम पाहीले. 'लच्छी' च्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील या यशाबद्दल 'पायपीट फिल्म्स् प्रोडक्शन' च्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चित्रीकरण ते एडिटिंग माजलगावातच
'लच्छी' या लघुपटात भटक्या विमुक्तांचे आयुष्य रेखाटण्यात आले आहे. याचे संपूर्ण चित्रण १२ दिवसात माजलगाव जवळील केसापुरी या छोट्याशा गावाशेजारी करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका चित्रीकरणादरम्यान संपूर्ण युनिटला बसला. मात्र, अडथळ्यांवर मात करत अखेर चित्रीकरण पूर्ण झाले. विशेष म्हणजे, त्यानंतरचे एडिटिंग आणि मिक्सिंग आदी तांत्रिक बाबी सुद्धा माजलगावातच करण्यात आल्या. 

दुर्लक्षित विषय हाताळत राहणार 
आगामी काळात उसतोड कामगार, ग्रामीण रस्ते यावर लघुपट निर्मिती करणार आहे. तसेच एका चित्रपटांची निर्मिती देखील आम्ही करणार आहोत. हे सर्व माजलगावात परिसरातच करणार आहोत.    
- ॲड. सतिष धुताडमल, दिग्दर्शक

Web Title: 'Lachchi' got Award at Singapore's World Film Carnival; Notice the hard work of the artists in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.