नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 02:19 PM2021-09-28T14:19:04+5:302021-09-28T14:19:30+5:30
rain in Beed : मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आल्याने वस्तीचा देवळाली गावासोबतचा संपर्क तुटला आहे.
कडा ( बीड ) : नदीवर पुल नसल्याने मुसळधार पावसानंतर देवळाली गावाचा संपर्क तुटतो. यामुळे वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांना जीवनावश्यक सामानासाठी पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. वस्तीवर असलेल्या मेंढवाडा देवीचा नवरात्र यात्रोत्सव असल्याने 'अंबे का गं आमचा रस्ता अडवला' अशी भावनिक हाक वस्तीवरील ग्रामस्थ देत आहेत.
आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथील गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मेंढवाडा ( देवीची वस्ती) असून या ठिकाणी तीनशे ते चारशे लोकवस्ती आहे. देवळाली ते वस्तीवर जाण्यासाठी कडी नदीवर पुल नसल्याने येथील लोकांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. या नदीवर पुल व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी देखील केली आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्याने लोकसहभागातून नदीवर कच्चा पूल उभारला होता. मात्र, टिकला नाही. आता मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आल्याने वस्तीचा देवळाली गावासोबतचा संपर्क तुटला आहे. यामुळे वस्तीवरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंसाठी पुराच्या पाण्यातून प्रवास करत आहेत. विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे प्रशासनाने अंत न पाहता या कडी नदीवर पूल उभारून देवीच्या वस्तीवरील लोकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते अतुल जवणे यांनी सांगितले.
अंबे आमचा रस्ता का गं अडवला
याच वस्तीवर तुळजाभवानीचे मंदिर आहे. नवरात्रात येथे यात्रोत्सव असतो. याच तोंडावर आता कडी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. यामुळे अंबे आमचा रस्ता का ग आडवला अशी भावनिक हाक भक्तगणांनी दिली आहे.