माजलगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:30+5:302021-01-23T04:34:30+5:30
कोरोना काळात प्रसुतीसाठी १७० महिलांना केले रेफर, ५० % महिलांची खासगी दवाखान्यांकडे धाव पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क ...
कोरोना काळात प्रसुतीसाठी १७० महिलांना केले रेफर, ५० % महिलांची
खासगी दवाखान्यांकडे धाव
पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात ऐन कोरोना आपत्ती काळात प्रसुतीतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णालयाकडे ५० टक्के महिलांनी पाठ फिरवत खासगी दवाखान्यांची वाट धरली आहे, तर सिझर करण्याची वेळ आल्याने १७० महिलांना इतरत्र रेफर करण्याची वेळ आली आहे. मात्र, असे असतानाही वरिष्ठांना याचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही.
माजलगाव ग्रामीण रुग्णालयात गत दोन वर्षांच्या काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत होत्या. यामुळे दररोज ४००-५०० ओपीडी होत असत. या ग्रामीण रुग्णालयात दर महिन्याला १५० ते २०० प्रसुती होत असत. यामुळे हे रुग्णालय २-३ वर्षांपूर्वी नावारूपाला आले होते. परंतु, मागील एक वर्षापासून डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याठिकाणी प्रसुतीतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्यामुळे ऐन कोरोना काळात प्रसुतींच्या संख्येत मोठी घट झाली.
दिनांक १ एप्रिल ते ३१ डिसेंबर, २०२० या आठ महिन्यांत ९८च्या सरासरीने केवळ ७८६ प्रसुतींची नोंद झाली. त्यापैकी ७५८ महिलांच्या प्रसुती झाल्या असून, केवळ २८ सिझर करण्यात आली. ही सिझर एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान झाली होती. ऑगस्टनंतर एकही सिझर याठिकाणी करण्यात आलेले नाही.
मागील आठ महिन्यांत सिझर करण्याची वेळ आलेल्या १७० महिलांना या रुग्णालयातून इतरत्र रेफर करण्यात आले. डॉक्टरांच्या अभावामुळे याठिकाणी सध्या केवळ शंभर ते दीडशेच ओपीडी होत असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या काळात याठिकाणी सुविधा मिळत नसल्याने, मोठ्या प्रमाणावर महिलांना प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठ फिरवत, खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र, वरिष्ठांना याचे काहीही सोयरसूतक राहिलेले नाही.
ग्रामीण रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून प्रसुतीतज्ज्ञ नसल्यामुळे याठिकाणी सिझर करण्यात आलेले नाही. प्रसुतीतज्ज्ञांची आम्ही अनेकवेळा वरिष्ठांकडे मागणी केली आहे. लवकरच डॉक्टर मिळतील, त्यानंतर सर्व सुरळीत होईल.
-डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय