अंबाजोगाईच्या बसस्थानकात सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:50+5:302021-03-16T04:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या अंबाजोगाईचे बसस्थानक सुविधांअभावी प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे बनल्याने अडचणीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या अंबाजोगाईचे बसस्थानक सुविधांअभावी प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे बनल्याने अडचणीचे ठरत असून, तत्काळ याठिकाणी सुविधा उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे. बसस्थानकातील खड्डे, बाहेरगावाहून येणाऱ्या एस. टी. बसेस मैदानात थांबवणे आदी समस्या याठिकाणी निर्माण झाल्या आहेत. अंबाजोगाईत सुसज्ज बसस्थानक बांधले जाणार, अशा बातम्या मध्यंतरी झळकल्या होत्या. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत याकडे लक्ष न दिल्याने बसस्थानकात गैरसोयी वाढल्या आहेत. या परिसरात खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाल्याने बसचालकाला मोठी कसरत करून स्थानकात बस आणावी लागते. त्याचबरोबर बसेस प्लॅटफॉर्मवर न लावता मैदानात थांबवल्या जात असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने हे अडचणीचे ठरत आहे. या बसस्थानकातील वाढत्या गैरसोयींबाबत प्रवाशांनी वारंवार आवाज उठवला, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
अंबाजोगाई बसस्थानकातून जाणाऱ्या व येणाऱ्या बसेसची संख्या मोठी असल्याने आहे ते प्लॅटफॉर्मही अपुरे पडतात. त्यामुळे नाईलाजास्तव बसेस मैदानात उभ्या केल्या जातात. या गैरसोयीचा प्रवाशांना मोठा त्रास होतो ही बाब लक्षात घेऊन एस. टी. प्रशासनाने तत्काळ यात लक्ष घालून सुविधा उपलब्ध कराव्यात व अंबाजोगाई बसस्थानक सुसज्ज होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.