पोलीस हद्दीच्या फलकाचा अभाव, प्रवाशांची मोठी कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:16+5:302021-01-18T04:30:16+5:30
अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस ...
अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस हद्दीचा फलक लावण्यात आलेला नाही. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर वाहन चालकांना अथवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलीस ठाण्याच्या मदतीची नितांत आवश्यकता भासते. मात्र, या रस्त्यावर बीड व लातूर अशा पोलिसांच्या दोन हद्दी आहेत. बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याची हद्द तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाण्याची हद्द. या दोन पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने आधार घ्यावा लागतो. जर एखादी दुर्घटना घडली तर जवळचे पोलीस ठाणे गाठल्यास ते आमच्या हद्दीत येत नाही, अशी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मदत टाळली जाते. त्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा दूरचा पल्ला पार करीत पाहिजे ते पोलीस ठाणे गाठावे लागते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. याचा मोठा फटका दूरदूरच्या प्रवाशांना प्रवास करतांना झालेला आहे. या दोन्ही हद्दीतील पोलीस अधिकारीही प्रवाशांना मदत करण्यासाठी धजावत नसल्याने प्रवाशांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतात. या अडचणी कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पोलिसांच्या हद्दीत फलक लावावेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.