रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:26+5:302021-04-21T04:33:26+5:30
अंबाजोगाई तालुक्यात रेशन दुकानांमधून पात्र लाभार्थींना अन्नधान्याचे वितरण केले जाते. अन्नधान्याचा प्रकार, वितरित करावयाचा साठा आणि प्रत्येक अन्नधान्याचा दर ...
अंबाजोगाई तालुक्यात रेशन दुकानांमधून पात्र लाभार्थींना अन्नधान्याचे वितरण केले जाते. अन्नधान्याचा प्रकार, वितरित करावयाचा साठा आणि प्रत्येक अन्नधान्याचा दर याबाबतची सर्व माहिती ग्राहकांना असावी. या उद्देशाने प्रत्येक रेशन दुकानदाराने आपल्या स्वस्त धान्य केंद्रात दर्शनी भागात दरपत्रक व माहितीपत्रक, तसेच तक्रार पेटी लावण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा विभागाने यापूर्वी वारंवार दिलेल्या आहेत. असे असतानाही अंबाजोगाई तालुक्यात अनेक दुकानांमध्ये दरपत्रकाचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतो. त्यामुळे अन्नधान्याचा दर काय आहे, याची माहिती ग्राहकांना मिळू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाने पावतीची मागणी केली असता त्या ग्राहकाला पावतीही दिली जात नाही. त्यामुळे शासकीय दरानुसार स्वस्त धान्य दुकानातून धान्याची विक्री होत नसल्याचा आरोप ग्राहकांमधून होत आहे. अन्नधान्य खरेदी केल्यानंतर पावती देण्यात यावी. दरपत्रक लावण्यात यावे. त्यावर सर्व बाबींचा उल्लेख करावा, याकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, अंबाजोगाई येथे तहसील कार्यालयात पुरवठा विभागासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत.
...तर कारवाई करणार
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव, तसेच इतर तक्रारींबाबत तहसीलदार विपीन पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, पुरवठा विभागाला सक्त सूचना देऊन सर्व स्वस्त धान्य दुकानांत दरपत्रक लावण्याबाबत आदेश देण्यात येईल, तसेच जे स्वस्त धान्य दुकानदार अन्नधान्य खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पावती देणार नाहीत, अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.