'लाखात एक खामगावची लेक'; गावात मिरवणूक काढून लेकीच्या जन्माचे होते स्वागत
By अनिल भंडारी | Published: January 8, 2024 12:09 PM2024-01-08T12:09:02+5:302024-01-08T12:09:43+5:30
गावातील जि.प.शाळेच्या शिक्षिकेच्या प्रयत्नांना ग्रामस्थांची साथ
बीड : मुलगी जन्माला आल्यानंतर गावात वाजतगाजत मिरवणूक काढून स्त्री जन्माचे स्वागत गेवराई तालुक्यातील खामगाव येथे केले जात आहे. 'लाखात एक खामगावची लेक' हा उपक्रम येथील जि.प.शाळेच्या शिक्षिकेने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केला आहे. तेव्हापासून खामगाव येथे मुलगी जन्मली की तिच्या घरापासून शाळेपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. मुलीच्या आईला साडी चोळी, वडिलांना शाल, श्रीफळ आणि मुलीला खेळणी व ड्रेस देऊन यथोचित सत्कार केला जातो.
राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार लोखसंख्येच्या गावातील बहुतांश ग्रामस्थांचा व्यवसाय हा शेती व ऊसतोडीचा आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून, पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा नागरगोजे यांनी ज्ञानदानासोबतच लेकीच्या जन्मोत्सवाच्या क्रांतीचे नवे पाऊल टाकले आहे. गावातील महेश मचे यांच्या घरी मनस्वीचे आगमन झाले. सावित्रीबाई फुले व बालिका दिनानिमित्त गावात वाजतगाजत लेझीमच्या पथकासह, सर्व गावातील महिलांनी औक्षण करून व फुलांचा वर्षाव करत, फटाके, फोडून लेकीच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शिक्षिका नागरगोजे यांच्या प्रयत्नांना खामगावकरांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. या कार्यक्रमात आपला परिवार वृद्धाश्रमाच्या संचालिका मनीषा पवार यांचा सन्मान करून त्यांना धान्य व रोख रक्कम देण्यात आली. यावेळी सरपंच डिगरे, मंडळ अधिकारी आंधळे, विनोद नरसाळे, गजानन चौकटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता गुंड हिने केले तर शारदा नागरगोजे यांनी आभार मानले.
मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव
गावात मिरवणूक काढून ठिकठिकाणी मुलीचं औक्षण करण्यात आले. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान फुलांचा वर्षाव करण्यात आला. मुलीच्या आई-वडिलांना झाडांची भेट देऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी विनंती केली. ज्या मुलांचे छत्र हरवले आहे, त्या मुलांनाही ड्रेस, पुस्तक देऊन गौरविण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले