मुक्ताबाईच्या इशाऱ्यानंतर ‘भूसंपादन’ जागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:25 AM2019-04-01T00:25:48+5:302019-04-01T00:26:14+5:30
तलावासाठी संपादित जमीन आणि विहिरीच्या उर्वरित मावेजासाठी वारंवार विनंती करून देखील भूसंपादन विभागाने मागणीची दाखल घेत नसल्याने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार मुक्ताबाई कोल्हे नामक महिला सकाळपासूनच आत्मदहनाच्या तयारीनिशी तलाव क्षेत्रात येऊन बसली होती.
शिरूर कासार : तलावासाठी संपादित जमीन आणि विहिरीच्या उर्वरित मावेजासाठी वारंवार विनंती करून देखील भूसंपादन विभागाने मागणीची दाखल घेत नसल्याने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार मुक्ताबाई कोल्हे नामक महिला सकाळपासूनच आत्मदहनाच्या तयारीनिशी तलाव क्षेत्रात येऊन बसली होती. मात्र, दुपारपर्यंत कुठलाच प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलाच नसल्याने अखेर विधिदूत समीर पठाण व अॅड. बबनराव येळे यांनी मध्यस्ती केली व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्ककरून त्यांच्याकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर मुक्ताबार्इंनी तूर्त आत्मदहन मागे घेतले.
तालुक्यातील टाकळवाडी येथील मुक्ताबाई तुकाराम कोल्हे व त्यांचा मुलगा यांच्या नावे असलेली ५० आर जमीन येथील गाव तलावात गेली होती. त्याचा ३० आर क्षेत्राचा मावेजा मुक्ताबाई यांना मिळाला होता मात्र २० आर क्षेत्र व विहिरीचा मावेजा वेळोवेळी मागणी करूनही मिळत नव्हता. त्यांच्या नातीचे लग्न निव्वळ पैशामुळे मोडण्याची वेळ आल्याने अखेर त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संबंधित विभागाला दिला होता. तरीही कसल्याही प्रकारची दखल प्रशासनाने न घेतल्याने अखेर ३१ मार्च रोजी त्या तलाव क्षेत्रात आत्मदहनाच्या तयारीनिशी येऊन बसल्या. दुपारपर्यंत कुणीच अधिकारी न आल्याने त्यांनी आत्मदहनाचा पक्का निर्धार केला होता. मात्र, गांभीर्य ओळखून विधि सेवा समितीचे विधिदूत समीर पठाण, अॅड. बबनराव येळे, सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव, सरपंच बापूसाहेब येळे, रमेश कदम, मंडळ आधिकारी पी.व्ही. मिसाळ यांनी घटनास्थळ गाठून मुक्ताबाई यांचे मन परिवर्तन केले.
संबंधित अधिकाºयाशी संपर्क करून त्यांना आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले. भूसंपादन विभागाचे एस.एल. मुळे, एम. टि. शेख यांच्यामार्फत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात बैठक घेऊन तात्काळ मावेजा देण्यासाठीची कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आत्मदहन आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.